परदेशात नोकरी... टेन्शन नॉट! मुंबईत होणार पहिलंवहिलं ओव्हरसिज प्लेसमेंट सेंटर

  • सीमा महांगडे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नोकरीसाठी परदेशात जायचंय.... मात्र राहायचे कुठे? मार्गदर्शन कोण करणार? नोकरी कुठे आणि कशी शोधायची? यांसारख्या प्रश्नांनी डोकं भांडावून जातं. मात्र आता सरकारकडून सुरु होणाऱ्या ओव्हरसिज प्लेसमेंट सेंटरमुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं चुटकीसरशी मिळणार आहेत. महाराष्ट्र शासनच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत अाता ओव्हरसिज प्लेसमेंट सेंटर सुरू करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचा हिरवा कंदिल मिळाला असून, आता भारताबाहेर नोकरीसाठी जाणाऱ्या कुशल युवकांना सुरक्षित रोजगार मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, राज्यातलं हे पहिलं ओव्हरसिज प्लेसमेंट सेंटर मुंबईत सुरू होणार आहे.

कौशल्य विकास विभागाचा पुढाकार

नवी दिल्ली इथं केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना याबाबतचं सादरीकरण कौशल्य विकास विभागामार्फत दाखवण्यात अालं असून त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार सर्व बाबी पडताळून त्वरीत ओव्हरसिज प्लेसमेंट सेंटर कार्यान्वित केलं जाईल, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. रोजगार देण्याच्या नावाखाली युवकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल केले जातात व त्यांची फसवणूक केली जाते. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत ओव्हरसिज प्लेसमेंट सेंटर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी त्याबाबतची तत्त्वता मान्यता मुख्यमंत्र्यांकडून मिळाली होती.

जागतिक पातळीवर काम करण्याची संधी मिळणार

परदेशातील नोकरी शोधणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे, हा या सेंटरचा मुख्य हेतू आहे. मुख्यता हे सेंटर परदेशात काम करणाऱ्या कुशल कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युवकांना भाषा कौशल्य इत्यादींसाठी मार्गदर्शन करेल, मुलाखत सत्र आणि पोस्ट प्लेसमेंटसाठी या माध्यमातून प्रशिक्षम दिलं जाईल.

जागतिक पातळीवर कुशल कामगारवर्गाची मोठ्या प्रमाणावर मागणी असून, त्यानुसार ग्रामीण व शहरी भागातील युवक व युवतींना या सेंटरमध्ये प्रशिक्षित केले जाईल. जेणेकरून जागतिक पातळीवर त्यांनाही काम करण्याची समान संधी मिळेल.

संभाजी पाटील निलंगेकर, राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री


हेही वाचा - 

डिग्रीअाधीच अायअायटीच्या विद्यार्थ्याला १.३९ कोटींची नोकरी

परदेशी नोकरीच्या नावाखाली फसवणाऱ्यास अटक


पुढील बातमी
इतर बातम्या