परळच्या बेस्ट कामगार वसाहतीची होणार दुरुस्ती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

परळ येथील बेस्टच्या कामगार वसाहतीतील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कारण  लवकरच परळ बेस्ट कामगार वसाहतीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत वसाहत दुरुस्त करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी १ कोटी २३ लाखाचा खर्च अपेक्षित आहे.

इमारतींची अवस्था बिकट

परळ येथील बेस्ट कामगारांच्या इमारतीचं बांधकाम १९५७ साली करण्यात आलं होतं. काळानुसार जीर्ण झालेल्या या वसाहतीमधील अनेक इमारतींना तडे गेले आहेत. तर काही इमारतींतील स्लॅब कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वसाहतीमधील रहिवाशांनी या इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. 

कामगारांची मागणी 

कामगारांच्या मागणीनुसार, बेस्ट प्रशासनाने येथील डी ते पी या इमारतींच्या प्रसाधनगृह, न्हाणीघरांचे दरवाजे आणि इतर दुरुस्त्यांचं काम करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मंगळवारी चर्चेसाठी बेस्ट समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेद्रकुमार बागडे यांनी परळ येथील कामगार वसाहतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असून, बेस्टच्या वसाहतींसाठी महापालिकेने १० कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं. 


हेही वाचा -

चिंचपोकळी परिसरात चौथ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू

'अशी' असेल राज्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया


पुढील बातमी
इतर बातम्या