Advertisement

'अशी' असेल राज्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया

देशात १७ व्या लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सर्वच पक्षांनी कंबर कसली असून निवडणुकीतील महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी मतदानाचे टप्पे वाढवण्यात आले आहेत.

'अशी' असेल राज्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया
SHARES

देशात १७ व्या लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सर्वच पक्षांनी कंबर कसली असून निवडणुकीतील महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी मतदानाचे टप्पे वाढवण्यात आले आहेत. गेल्या वेळी ५४३ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झालं होतं. परंतु यावेळी देशभरात ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. ११ एप्रिलला मतदानाची सुरुवात होणार असून, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होईल. तर २३ मे रोजी मतमोजणी होईल. गेल्यावेळी देशभरात असलेल्या मोदी लाटेमुळे निवडणुकांचे निकाल अगदी वेगळे लागले होते. परंतु यावेळी परिस्थिती थोडी विपरीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्ष विरुद्ध काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष अशी लढत रंगलेली पहायला मिळेल. आज आपण महाराष्ट्रातील आणि प्रामुख्याने मुंबईतील माहिती घेणार आहोत.


राज्यात ४ टप्प्यात मतदान

निवडणूक आयोगाने शनिवारी घेतलेल्या तातडीच्या बैठकीनंतर लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार याची कुणकुण लागलीच होती. परंतु लगेचच रविवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, याची खात्री कोणालाही नसेल. यावेळी मात्र निवडणूक आयोगानंही उमेदवार आणि पक्षांभोवती फास आवळण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात ६ ते ७ टप्प्यात मतदान होणार, असा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत होते.

परंतु निवडणूक आयोगानं त्यांच्या अंदाजांवर पाणी फेरत ४ टप्प्यात मतदान होणार असल्याचं जाहीर करून टाकलं. नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण-मुंबई, मावळ, शिरुर आणि शिर्डी या १७ ठिकाणी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. 


मतदारांच्या संख्येत वाढ

गेल्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत राज्यातील मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०१४ साली ८ कोटी ७ लाख ९८ हजार ८२३ मतदार होते. यावेळी ३१ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अंतिम यादीनुसार राज्यात ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ मतदार असतील. यामध्ये ४ कोटी ५७ लाख २ हजार ५७९ पुरूष मतदार, ४ कोटी १६ लाख, २५ हजार ८१९ स्त्री मतदार तर २ हजार ८६ तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसंच यावेळी गेल्या निवडणुकाच्या तुलनेत शहरी भागातील मतदार केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे.अॅपची मदत

यंदाच्या निवडणुकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावं या हेतूने आयोगाने नवी अप तयार करण्यातआलं आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आल्यास त्याची तक्रार सी-विजिल या ॲपवरून करता येऊ शकते. तर दिव्यांगांना मतदार नोंदणी करणं, मतदान केंद्राचा शोध घेणं, व्हील चेअरची मागणी नोंदविणं या सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे या पीडब्ल्यूडी ॲपचा उपयोग होईल. तर १९५० ही २४ तास हेल्पलाईनदेखील सुरू करण्यात आली आहे.१८ हजार कर्मचाऱ्यांची गरज

मुंबई शहर जिल्ह्यांमध्ये २ हजार ६०० मतदान केंद्रांचा समावेश असून प्रत्येक मतदान केंद्रामध्ये प्रत्येकी ५ कर्मचारी आणि अधिकारी याप्रमाणे १३ हजार कर्मचारी आणि अतिरिक्त कर्मचारी-अधिकारी असे मिळून एकूण १८ हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यापैकी बहुसंख्य कर्मचारी मुंबई महापालिका कर्मचारी, मंत्रालय कर्मचारी, आयकर विभागातील कर्मचारी, वस्तू व सेवा कर विभाग, रेल्वे अशा विविध राज्य व केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामांसाठी नियुक्ती होणार आहे. मुंबई महापालिकेचे सुमारे ३ हजार कर्मचारी या कामात सहभागी होणार आहेत.


या देशात ईव्हीएमचा वापर

भारतात पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर १९८२ मध्ये केरळच्या पारूर विधानसभा क्षेत्रात करण्यात आला होता. त्या नंतर १९९९ च्या निवडणुकांदरम्यान ठराविक ठिकाणी आणि २००४ सालच्या निवडणुकांत देशभरात ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. ब्राझील, फिलिपिन्स, बेल्जियम, एस्टोनिया, संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला, जॉर्डन, मालदीव, नामिबिया, नेपाळ, भूतान, इजिप्त या देशांमध्ये ईव्हीएमच्या साहाय्याने मतदान घेण्यात येतं. तर जर्मनी, नेदरलँड, इटली आणि अमेरिकेत ईव्हीएमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.


पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट

या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्वच जागांसाठी व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळं आपण दिलेलं मत योग्य उमेदवाराला मिळालं आहे किंवा नाही याची खात्री करता येणार आहे. ईव्हीएमबाबत विरोधी पक्षांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने यंदा सर्व जागांसाठी मतदारांना त्यांनी केलेल्या मतदानाची पावती व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मिळणार आहे.शाईऐवजी डाय

देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या शाईचं श्रेय देण्यात येतं. त्यापूर्वी शाईऐवजी डायचा वापर करण्यात आला होता. १९६२ साली झालेल्या निवडणुकांदरम्यान या शाईचा वापर करण्यात आला. निवडणुकांसाठी वापरली जाणारी शाई ही इतर शाईपेक्षा वेगळी असते. भारतात ही शाई म्हैसूर पेन्ट्स अँड वर्निश लिमिटेड या कंपनीत तयार करण्यात येते. कॅनडा, कंबोडिया, मालदीव, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या देशांमध्येही या कंपनीकडून निवडणुकीची शाई देण्यात येते.मुंबईतील महत्त्वाचे मतदारसंघ

मुंबई आणि मुंबई उपनगरात ६ लोकसभा मतदारसंघ येतात. यामध्ये मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई मतदारसंघांचा समावेश होतो.


मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ

१९७७ आणि १९८० च्या निवडणुकांमध्ये सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या सलग २ विजयानंतर कोणालाही या ठिकाणी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवता आला नाही. सध्या हा मतदारसंघ भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांच्या ताब्यात आहे. गेल्या चार वर्षांमधील त्यांची कारकीर्द पाहता त्यांच्यासाठी येणारा काळ हा खडतरच असणार आहे. यावेळी त्यांच्या विरोधात पुन्हा एका काँग्रेसचे संजय दिना पाटील उभे राहण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीमध्ये सोमय्या यांनी संजय पाटील यांना तब्बल ३ लाखांपेक्षा अधिक मतांनी मात दिली होती. त्यामुळं यावेळी या मतदारसंघात चुरशीची लढाई पहायला मिळणार आहे.उत्तर पश्चिम मतदारसंघ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अभिनेते दिवंगत सुनील दत्त आणि त्यांची कन्या प्रिया दत्त यांच्या विजयाच्या रूपाने या मतदारसंघावर कायमच काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. परंतु गेल्या निवडणुकांमध्ये तयार झालेल्या वातावरणानंतर काँग्रेसला या ठिकाणी जोरदार धक्का बसला आणि शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी हा मतदारसंघ आपल्याकडं खेचून आणला. गुरूदास कामत यांना त्यांनी २ लाख मतांनी धूळ चारली. आता याच मतदारसंघातून काँग्रेसकडून कृपाशंकर सिंह, संजय निरूपम आणि प्रियंका चतुर्वेदी हे इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं काँग्रेस कोणाला संधी देईल आणि युतीचा कोण उमेदवार असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


याव्यतिरिक्त गोपाळ शेट्टी यांच्या ताब्यात असलेला उत्तर मुंबई मतदारसंघ, तर समस्या सुटण्याच्या प्रतिक्षेत असलेला पूनम महाजन यांचा उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, तर राहुळ शेवाळे यांचा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि मोदी लाटेत लॉटरी लागलेल्या शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा दक्षिण मुंबई मतदारसंघ त्यांना आपल्याजवळ टिकवता येईल का किंवा तो अन्य कोणाकडं निसटेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा