पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

  • मानसी बेंडके & नितेश दूबे
  • सिविक

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या ११ दिवसांपासून ही दरवाढ होत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना पुन्हा एकदा याचा फटका बसणार आहे.

सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री

पेट्रोल दर प्रति लिटरमागे १६ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर २० पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८६.७२ रुपयांपर्यंत पोहोचले असून डिझेलचे दर प्रति लिटर ७५.७४ रुपयांपर्यंत पोहचले आहेत. सोमवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर ८६.५६ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ७५.५४ असे होते.  

...म्हणून पेट्रोलच्या दरात वाढ

मुंबईत पेट्रोलवर सर्वात जास्त म्हणजे ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट घेतला जातो. त्याचा सरळ परिणाम इंढनाच्या किंमतींवर होतो. त्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती देखील भडकल्या आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत.

प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमनं गेल्या वर्षी जूनपासून सुरू केली. त्यानुसार ही इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली. 

दरवाढीवर काँग्रेस आक्रमक

दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडिनं जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला पाहिजे अशी मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली आहे

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत ते नियंत्रणात आणण्यासाठी जीएसटीच्या कक्षेत आणणं आवश्यक आहे, असं ट्वीट चिदंबरम यांनी केलं आहे. याशिवाय त्यांनी दरवाढीवर प्रश्न देखील उपस्थित केला आहे. पेट्रोल आणि डिझेल यांचे दर का वाढले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. देशात १९ राज्यांमध्ये भाजपाचेच सरकार आहे मग त्या राज्यांमध्येच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती का भडकल्या, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. 


हेही वाचा

डाॅलरच्या तुलनेत रुपयाचा विक्रमी नीचांक; ७०.५२ रुपये एका डाॅलरची किंमत

पुढील बातमी
इतर बातम्या