महापालिका करणार १५० किमीच्या रस्त्यांची दुरुस्ती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सेवा उपयोगिता कंपन्यांच्या कामानिमित्त होणारे खोदकाम, वाहनांमुळं होणारी झीज आणि पावसाळ्यात पडणारे खड्डे यामुळं मुंबईतील रस्त्ये खराब होत आहेत. ही बाब लक्षात घेत आगामी वर्षांत सुमारे १५७ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा संकल्प मुंबई महापालिकेनं सोडला आहे. त्यासाठी आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पात एक हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईतील सुमारे १,८५० कि.मी. लांबीचे रस्ते पालिकेच्या अखत्यारीत असून त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे. दरवर्षी मुसळधार पाऊस आणि साचणारे पाणी यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून त्यांची वाताहात होते. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली.

अनेक भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. वाहनांमुळेही रस्त्याची झीज होत असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं. त्याचबरोबर सेवा उपयोगीता कंपन्यांकडून विविध कामांसाठी रस्त्यांवर खोदकाम करण्यात येतं. खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्तीही केली जाते. मात्र, त्यामुळं रस्ते असमतोल होतात आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या बाबी लक्षात घेऊन महापालिकेनं टप्प्याटप्प्यानं रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याअंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये विविध ठिकाणच्या सुमारे १७५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये १२ किलोमीटर लांबीच्या डांबरी, तर १४५ किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मागील आठवड्यात स्थायी समितीला सादर केलेल्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात रस्ते दुरुस्तीसाठी १ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

आगामी वर्षांत करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या आणि डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी एप्रिल महिन्यात निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. रस्त्यांच्या कामादरम्यान खराब होणारे सूचना फलकही बसविण्यात येणार आहे.

१२३ किमीच्या रस्त्यांचा कायापालट

  • महापालिकेतर्फे २०२०-२१ या वर्षांमध्ये १२३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. यामध्ये ५७ किमीच्या डांबरी, तर ६६ किमी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचा समावेश होता.
  • मुंबईतील नवीन प्रभादेवी मार्ग, पश्चिम उपनगरातील सागबाग मार्ग, एलआयसी मार्ग, तर पूर्व उपनगरांतील भांडुप पोलीस ठाणे ते रेक्टिफायर दरम्यानचा लेक मार्ग, मृत्यांजली मार्ग, भट्टीपाडा मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात आले.
  • मुंबईतील त्रिभुवन मार्ग, रस्ता क्रमांक २५ सायन, पश्चिम उपनगरातील डी. डी. बोरगे मार्ग, चिल्ड्रन कॉम्प्लेक्स मार्ग, तर पूर्व उपनगरांतील म्हाडा कॉलनी मार्ग, गोविंद गल्ली मार्ग या डांबरी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा -

केवळ १० जणांच्या उपस्थितीतच शिवजयंती, सरकारची मार्गदर्शक नियमावली जाहीर

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रंगनाथ पठारे यांना जाहीर


पुढील बातमी
इतर बातम्या