Advertisement

केवळ १० जणांच्या उपस्थितीतच शिवजयंती, सरकारची मार्गदर्शक नियमावली जाहीर

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे.

केवळ १० जणांच्या उपस्थितीतच शिवजयंती, सरकारची मार्गदर्शक नियमावली जाहीर
SHARES

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे. परंतु कोरोना विषाणू (coronavirus) प्रादुर्भावामुळे यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे. त्याअनुषंगाने मार्गदर्शक नियमावली जाहीर करत केवळ १० जणांच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन देखील शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणं अपेक्षित आहे.

दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक, इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमांचं केबल नेटवर्क अथवा आॅनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. 

हेही वाचा- नियम पाळणं अहंकार आहे का? राऊतांचं भाजपला सडेतोड उत्तर

तसंच कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावं आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसंच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

आयोग्यविषय उपक्रमांचं आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसंच स्वच्छतेचे नियम(मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावं.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच संबंधित महापालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन, यांनी विहित केलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असे निर्देश देण्यात आले आहेत.

(maharashtra government issued guideline for shiv jayanti)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा