Advertisement

नियम पाळणं अहंकार आहे का? राऊतांचं भाजपला सडेतोड उत्तर

राज्यपालांना नियमानुसार विमान मिळालं नाही हा अहंकार कसा असू शकतो? असा प्रश्न विचारत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

नियम पाळणं अहंकार आहे का? राऊतांचं भाजपला सडेतोड उत्तर
SHARES

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास नाकारण्यात आल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे. राज्यपालांना विमानातून खाली उतरायला लावणारं एवढं अहंकारी सरकार आतापर्यंत बघितलं नाही, असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले. त्यावर नियम पाळणं अहंकार आहे का? ज्याप्रकारे कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका हा अहंकार नसून नियमांचं पालन आहे, तर राज्यपालांना नियमानुसार विमान मिळालं नाही हा अहंकार कसा असू शकतो? असा प्रश्न विचारत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, या विषयाचा आणि भाजपचा काय संबंध आहे? भाजपला इतकंच वाईट वाटत होतं तर त्यांचं विमान द्यायचं होतं. भाजपकडे (bjp) खूप व्यवसायिक विमानं आहेत. कोश्यारी भाजपचे नेते आहेत. त्यामुळेच अलिकडे राजभवनात राज्यापेक्षा भाजपची कामंच जास्त चालतात, अशी लोकांची भावना आहे. राज्यपालांचा अपमान व्हावा अशाप्रकारचं कोणतंही काम राज्य सरकार किंवा राज्याचे मुख्यमंत्री करणार नाहीत आणि त्यानी केलंही नाही.        

हेही वाचा- राज्यपालांना ठाकरे सरकारने विमानातून उतरवलं? भाजप आक्रमक

राज्यापालांना खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा वापरायची असल्यास त्यासंदर्भात काही नियम आहेत. त्या नियमांचं पालन राज्य सरकारने केलं आहे. याच नियमांचं उल्लंघन केलं असतं तर त्यावरही आक्षेप घेण्यात आला असता. अनेक राज्यांमध्ये असे प्रकार घडले आहेत. नियमांचं पालन करून महाराष्ट्र सरकारने संविधानाचा, कायद्याचा सन्मान राखला आहे, असं संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितलं.  

राज्यपालांना सरकारी कामासाठी ज्यावेळेस हेलिकॉप्टर, विमान हवं असेल तेव्हा ते सरकारने उपलब्ध करुन दिलं आहे. कोश्यारी गोव्याचेही राज्यपाल आहेत. तिथं भाजपचं सरकार आहे, थोडा भार त्यांच्यावरही टाकायला हवा. यामागे कोणतंही राजकारण, सुडाची भावना नाही. त्यामुळे भाजपचा तीळपापड होण्याची गरज नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला. खासगी विमान असुरक्षित वाटत असेल, तर  राज्यपालांनी आपलं वय पाहता राजभवनाबाहेर पडणंच चुकीचं आहे, असा सल्लाही दिला. 

(sanjay raut replies devendra fadnavis on governor bhagat singh koshyari issue)

हेही वाचा- सरकारी विमान कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही, फडणवीसांचा हल्लाबोल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा