घरगुती गॅस ५३ रुपयांनी स्वस्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

होळीच्या सणापूर्वी केंद्र सरकारने रविवारी एलपीजीच्या किंमती कमी केल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १४.२ किलोचा विना अनुदानित एलपीजी सिलिंडर ५३ रुपयांनी आणि १९ किलोचा वाणिज्यिक सिलिंडर ८४.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवीन दर १ मार्चपासून लागू झाले आहेत.  १२ फेब्रुवारीला विना अनुदानित सिलिंडर १५० रुपयांनी महाग झाला होता. तसंच चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी करण्यात आले.  चार महानगरांमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमती अनुक्रमे ५३ रुपये, ५६.५० रुपये, ५३ रुपये आणि ५५ रुपये कमी झाल्या आहेत.

मुंबईसह अनेक राज्यांत गॅस सिलिंडरची किंमत कमी झाली आहे. नव्या किंमतींनुसार, दिल्लीत ८०५.५० रुपये, मुंबईत ७७६.५० रुपये, कोलकातात ८३९.५० रुपये, चेन्नईत ८२६ रुपये सिलिंडरचा भाव झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी रविवारी पेट्रोलच्या दरात दिल्लीमध्ये १८ पैसे, कोलकातामध्ये १५ पैसे, मुंबईत १६ पैसे आणि चेन्नईमध्ये १७ पैसे प्रतिलिटर कपात केली. दिल्लीत डिझेल २१ पैशांनी, कोलकातात २० पैशांनी  तर मुंबई आणि चेन्नईमध्ये  २६ पैशांनी स्वस्त झाले आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमधील पेट्रोलची किंमत अनुक्रमे ७१.७१ रुपये, ७४.३८ रुपये, ७७.४० रुपये आणि ७४.५१ रुपयांवर आली आहे. 


हेही वाचा  -

कर थकवणाऱ्या ३३९२ मालमत्ता पालिकेकडून जप्त

१८ नव्हे ९ लाख, गिरणी कामगारांच्या घरांची किंमत मुख्यमंत्र्यांनी केली कमी


पुढील बातमी
इतर बातम्या