राजकीय दबावामुळे ‘त्या’ नुतनीकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनेला नर्सिंग होमचे नुतनीकरणाचे कामच जबाबदार असून तळमजल्यावरील जागेत सुरु असलेल्या या नुतनीकरणामध्ये चक्क खांबच (पिलर) तोडण्यात आले आहेत. एक नव्हे तर दोन खांब या नुतनीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आले आहेत. हे नर्सिंग होम शिवसेनेचे पदाधिकारी आणि नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार असलेल्या सितप कुटुंबाचे आहे. सितप हे शिवसेनेचे असल्यामुळे कोणतीही परवानगी न घेता, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांनी हे बांधकाम केले असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

नर्सिंग होम ऐवजी लॉजिंग हाऊसची निर्मिती?

तळ मजल्यावर असलेले नर्सिंग होम बंद करून त्याऐवजी लॉजिंग हाऊस बनवण्यासाठी सितप यांनी या गाळ्यांचे नुतनीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यासाठी पिलर तोडून अधिक जागा मोकळी करण्याच्या प्रयत्नात या इमारतीला धोका निर्माण केला. सुनील सितप हे घाटकोपरमधील केबल ऑपरेटर म्हणून शिवसेनेचे मोठे प्रस्थ ओळखले जात आहे. महापालिका निवडणुकीत सितप यांच्या पत्नीला शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती. परंतु,या मतदार संघात मनसेचे माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या पत्नीने त्यांचा पराभव केला. सितप यांच्या अरेरावीपणामुळेच शिवसैनिकांनी भालेराव यांच्या बाजूने कौल दिला होता.

दोषींवर कारवाई व्हायलाच हवी - महापौर

या इमारतीच्या नुतनीकरणाच्या बांधकामाला परवानगी दिली किंवा नाही याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अर्थात ही वेळ तशी नाही. ढिगाऱ्याखाली जे अडकले आहेत, त्यांना प्रथम बाहेर काढणे हे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे ही परवानगी घेतली होती किंवा नाही याची माहिती समोर आणून जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जावी, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले. तसेच हे बांधकाम सुरु असताना तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी जर दोषी असतील, तर त्यांच्यावरही कारवाई केली जावी, असेही त्यांनी सांगितले.

दबाव टाकणाऱ्यांची नावे जाहीर करा

हे बांधकाम सुरु असताना जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणी दबाव टाकला असेल, तर त्यांचेही नाव पुढे यावे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाव सांगावे, असे सांगत या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केली.

जीवापेक्षा पक्ष मोठा नाही

घटना नैसर्गिक नसून चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर नूतनीकरणाचे कामकाज सुरू होते. यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सहायक आयुक्तांनी कबूल केले आहे. हे बांधकाम सुरू असलेल्या गाळ्याचे मालक हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे जीवापेक्षा पक्ष मोठा नाही, असेही त्यांनी सांगितले.

इमारत दुघर्टनेप्रकरणी चौकशीसाठी चौरे-चिठोरे समिती

घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विशेष चौकशी समितीचे आदेश दिले आहेत. या विशेष चौकशी समितीमध्ये उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चौरे व प्रभारी संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) विनोद चिठोरे यांचा समावेश आहे. ही चौरे आणि चिठोरे समितीला पुढील १५ दिवसांमध्ये या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

आधीच्या सहायक आयुक्तांची बदली अनधिकृत बांधकामामुळेच

महापालिकेच्या एन विभागाचे यापूर्वीचे सहायक आयुक्त सुधांशू द्विवेदी यांनी अनधिकृत बाधकामाला संरक्षण दिल्याचा ठपका ठेवत त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. परंतु द्विवेदी यांच्या रिक्त जागेवर भाग्यश्री कापसे यांची नियुक्ती दोनच महिन्यांपूर्वी झालेली असून या प्रभागाच्या नामनिर्देशित असलेल्या कार्यकारी अभियंत्यांमुळेच येथील सहायक आयुक्त अडचणीत सापडत असल्याचे समोर येत आहे.


हेही वाचा

घाटकोपरमध्ये 4 मजली इमारत कोसळली


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या