Advertisement

घाटकोपरमध्ये 4 मजली इमारत कोसळली, 17 ठार


घाटकोपरमध्ये 4 मजली इमारत कोसळली, 17 ठार
SHARES

घाटकोपरच्या दामोदर पार्क येथील साईदर्शन अपार्टमेंटमधील एक चार मजली इमारत कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.43 वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एनडीआरएफचे पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून 18 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 रहिवासी आणि अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी झाले आहेत. या इमारतीच्या तळमजल्यावर शकुंतला नावाचे नर्सिंग होम होते. त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना इमारतीचे पिलर काढण्यात आल्यानेच ही इमारत कोसळल्याची माहिती उघड झाल्यानंतर त्याचा मालक आणि शिवसेनेचा पदाधिकारी शितप याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी त्याला विक्रोळी न्यायालयात हजर केले असता 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून यातील जखमींना उपचारासाठी राजावाडी, शताब्दी, शांतिनिकेतन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये राजावाडीत दाखल असलेल्या रंजनाबेन शाह या 60 वर्षांच्या वृद्ध महिलेसह, तीन महिन्यांची चिमुकली व्ही. रेणुका ठक, सुलक्षणा खानचंदानी (89), मनसुखबाई गजर (75) यांच्यासह आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये 10 महिला, 6 पुरुष आणि अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. रुग्णवाहिका नेण्यासाठी एलबीएस मार्गावरील एक बाजू रिकामी केली असून दुसऱ्या बाजूने सर्व वाहतूक वळवण्यात आली. 

ही रहिवासी इमारत 48 वर्ष जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या इमारतीत 20 ते 25 कुटुंब वास्तव्यास होते. श्रेयस सिनेमाजवळ असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर शकुंतला नावाचे प्रसुतीगृह देखील होते. सध्या त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ही इमारत धोकादायक असून तशी नोटीसही पाठवण्यात आली होती, असे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितले. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.



घाटकोपरमधील ही इमारत 15 ते 20 वर्ष जुनी होती. या इमारतीच्या तळमजल्यावर अधिकृत काम सुरू होते. ती अचानक कशी कोसळली, याची चौकशी व्हावी. तसेच महापालिका आणि सरकारच याला जबाबदार आहे.

- नसीम खान, आमदार, काँग्रेस

 


मृतांची नावे

  1. रंजनबेन शहा (62) 
  2. सुलक्षणा खानचंदानी (80) 
  3. व्ही. रेणुका ललित ठक (3 महिन्यांची मुलगी)
  4. मनसुखभाई गज्जर (75)
  5. अमृता ललित ठक (31 )
  6. पंढरीनाथ डोंगरे (75) 
  7. दिव्या पारस अजमेरा (48) 
  8. मिकुल खानचंदानी (22) 
  9. ऋत्वी प्रितेश शहा (14) 
  10. किशोर खानचंदानी (50) 
  11. मनोरमा डोंगरे (70) 
  12. क्रीषू डोंगरे (13 महिने) 
  13. प्रमिला विठ्ठल ठक (56)
  14. निराली पारस अजमेरा (24) 
  15. हिना विजय दियोरा (48) 
  16. सुभेद्रबेन धिरजलाल दियोरा (70)
  17. विजय धिरजलाल दियोरा

जखमींची नावे

  1. वर्षा सकपाळ
  2. गीता रामचंदानी
  3. विठ्ठल श्रीगिरी
  4. अब्दुल मोहमद इस्माईल शेख
  5. सुभाष चव्हाण
  6. रिती खानचंदानी
  7. प्रणयाबेन
  8. गणेश टाकडे
  9. प्रितेश शाह
  10. पारस अजमेरा
  11. ऑल्डिकोस्टो डिमेलो
  12. धर्मिष्ठा शाह



दुर्घटनाग्रस्तांना राज्य सरकारची आर्थिक मदत

घाटकोपर दुर्घटनेचा आढावा घेताना दुर्घटनाग्रस्तांना अर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, अपंगत्व आलेल्यांना तीन लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींच्या उपचारांचा पूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. 

या इमारत दुर्घटनेनंतर मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेबाबत 15 दिवसांत अहवाल पाठवण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले. पालिकेने इमारत धोकादाय असल्याची नोटीस सहा महिन्यांपूर्वी दिली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. 


धनंजय मुंडेंनी दुर्घटनेचे खापर शिवसेनेवर फोडले

घाटकोपर दुर्घटना ही मानवनिर्मित घटना आहे. या घटनेसाठी जेवढा शितप जबाबदार आहे, तेवढीच 17 जणांच्या मृत्यूला पालिका जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केला. त्याठिकाणी असलेले नर्सिंग होम बंद करून 'बार अँड रेस्टोरंट' सुरू करण्याचा शितप याचा डाव असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. या 36 वर्ष जुन्या इमारतीची पालिकेकडून दुरुस्ती करण्यात आली नाही. 

ही इमारत धोकादायक नव्हती असे पालिका आणि गृहनिर्माण विभागाकडून सांगण्यात आले असताना ही घटना घडली कशी असा प्रश्नही मुंडे यांनी विचारला. सुनील शितप शिवसेनेच्या पालिका निवडणुकीत उभे होते. आपला निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी 17 जणांचा बळी घेतल्याचा हा घाट आहे. अनेक वर्षांपासून पालिकेत शिवसेनेची सत्ता असून अनधिकृत बांधकाम पालिका आणि सत्तेत असणाऱ्यांच्या आशीर्वादाने होतात असा आरोपही त्यांनी केला. सरकारने या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख तर, जखमींना 3 लाखांची मदत करावी अशी मागणीही मुंडे यांनी केली.  



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा