Advertisement

हक्काचं छप्पर धाडकन् कोसळतं तेव्हा...


हक्काचं छप्पर धाडकन् कोसळतं तेव्हा...
SHARES

देशभरातून मुंबईकडे धावणाऱ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे मुंबईत आपलं हक्काचं घर असावं. आणि, या घरोंद्यासाठी आयुष्यभर धडपड करणाऱ्या या मंडळीचं हेच हक्काचं छप्पर कधीही धाडकन् कोसळतं तेव्हा...? घाटकोपरच्या साईदर्शन इमारतीत राहणाऱ्यांच्या नशिबी हेच घडलंय आणि त्यांच्या भावना समजून घेणंही कठीण झालंय.

मुंबईला पावसाळ्यात इमारती पडणं म्हणजे अगदीच कॉमन आहे बरं. गेली अनेक वर्षं हे नित्यनेमाने घडतंय आणि त्याचं कुणालाही सोयरसुतक नाही. कधी इमारती पडतात तर कधी झोपड्यांवर दरडी कोसळतात. पण दरवर्षी वरुणराजाच्या कृपेनं बळी देण्याचं चक्र थांबत नाही, असं म्हटलं तर मानवी चुकांचं खापर आपण पावसावर फोडत राहतो. नेते, अधिकारी घटनास्थळी भेटी देतात, दुःख व्यक्त करतात, काही प्रमाणात मदतीचाही हात देतात. परंतु, मूळ प्रश्न कधीच सोडवला जात नाही आणि ही पडझड कायम सुरू राहते.

खरंतर मुंबई ही मायानगरी. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, आशिया खंडातलं राहण्यासाठी सर्वात महागडं शहर. तर, 2012 मध्ये ब्लूमबर्गने केलेल्या विश्लेषणानुसार, सर्वसामान्यास मुंबईत सर्व सुविधा असलेला फ्लॅट घ्यायचा असेल तर किमान 300 वर्ष काम करत राहावे लागेल. पगार आणि फ्लॅटची किंमत याचं गुणोत्तर हे असं आहे.

भाड्याचं घर म्हणाल, तर 1बीएचकेसाठी किमान 12 ते 20 हजार आणि 2 लाखांपर्यंत डिपॉझिट (इसारा) भरणं आलंच. आता सांगा इतका पैसा नसणाऱ्यांनी काय करायचं? म्हणूनच बहुतांश मुंबईकर (60 टक्क्यांवर) झोपडपट्ट्या किंवा चाळींमध्ये राहतात.

आता, अशा या महागड्या मुंबईत इमारतींमध्ये राहायला मिळणं म्हणजे भाग्यच की नाही? मग जेव्हा पेपरात किंवा स्टेशन्सवर स्वस्त घरांची जाहिरात दिसते, त्यावर झुंबड उडणं स्वाभाविकच आहे ना? त्यातूनच बिल्डरांची फसवेगिरी, कच्चं बांधकाम वगैरे प्रकरणं घडतात. सरतेशेवटी अशाच इमारती मध्येच कधीतरी माना टाकतात आणि स्वतःबरोबरच रहिवाशांनाही घेऊन जातात.

जे नशीबवान(?) मुंबईकर आहेत त्यांच्याकडे वडिलोपार्जित घरं आहेत. अशा जवळपास 14 हजारांवर इमारती आहेत की ज्या 70 वर्षांपेक्षा जुन्या आहेत. त्यातील तब्बल 900 च्या घरातील इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. आता त्यात अ, ब, क, ड अशा काहीतरी कॅटॅगरीज केल्या असल्या तरी थोडक्यात सांगायचं तर घरटी मृत्यूच्या सापळ्यातच आहेत.

जुन्या घरांचं म्हणाल तर पागडी सिस्टिममुळे घरमालक विरुद्ध भाडेकरू या संघर्षात या इमारतींचं भवितव्य लटकलं आहे. घरमालकाला डागडुजी परवडत नाही किंवा त्याला बिल्डरबरोबर धंदा करायचा असल्याने भाडेकरूंचं अस्तित्वच नकोसं असतं. तर, भाडेकरूही पुनर्विकासात हक्काचं घर आज ना उद्या मिळेल या आशेवर राहतात. आजवरचा अनेकांचा अनुभव पाहता पुनर्विकासासाठी घर सोडलं तर नवं छप्पर म्हणून मिळालेल्या ट्रान्झिस्ट कॅम्पच तात्पुरतं छप्परच कायमचं बनलेलं आढळतं.

बरं मुंबईतल्या गृहनिर्माण सोसायट्यांचं म्हणाल तर, शहरात 31 हजारांवर को-ऑपरेटिव्ह सोसायट्या आहेत. त्यात, उपनगरांमध्ये भाडेतत्त्वावरील 10 हजार, तर दक्षिण मुंबईत सुमारे 18 हजार इमारती किमान 50 ते 60 वर्षं जुन्या आहेत. या इमारतींनाही लवकरच रिडेव्हलपमेंटची गरज भासणार आहे.

यातील जवळपास 15 हजारांवरील सोसायट्या अशा आहेत की त्यांना तातडीची दुरुस्ती गरजेची आहे. मात्र, रिडेव्हलपमेंटचं स्वप्न बघत ना दुरुस्ती ना रिडेव्हलपमेंट अशा चक्रात अडकून पडलेल्या यातल्या रहिवाशांची अवस्था बिकटच आहे. यापैकी जेमतेम 10 टक्के इमारतीच दुरुस्तीवर पैसा खर्च करतात, असे आकडेवारी सांगते.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, स्ट्रक्चरल ऑडिट नावाचा प्रकार कागदावरून काही प्रमाणात प्रत्यक्षात आलेला दिसत असला तरी अजूनही त्याची व्याप्ती वाढलेली नाही. या नियमानुसार, इमारतीचे आयुष्य संपल्यानंतर म्हणजे सुमारे 30 वर्षांनंतर स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करणं बंधनकारक आहे. परंतु, नियम कठोर करूनही 10 टक्क्यांपेक्षा कमी इमारती स्ट्क्चरल ऑडिट करून घेत असल्याचे चित्र समोर आहे.

बोरिवलीतील लक्ष्मी निवास असो किंवा आताची घाटकोपरची साईदर्शन, या इमारतींच्या तळमजल्यावर नुतनीकरणाचे काम सुरू होतं, असं स्पष्ट झालंय. स्वतःचं घर किंवा दुकान सजवताना पिलर्सशी छेडछाड करणाऱ्या आर्किटेक्ट, इंटिरिअर डेकोरेटर्सच्या अकलेचं दिवाळं निघालं असणार हे तर नक्कीच. परंतु, त्यांना परवानगी देण्याची जबाबदारी असणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह लागतंय. त्यामुळे, अशा दुर्घटनांनंतर जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर नुसती निलंबन किंवा चौकशीची कारवाई न होता, कठोर म्हणजे मनुष्यवधास जबाबदार असल्याचा ठपका ठेवून कारवाई व्हावी. म्हणजे, भविष्यात तरी अशा दुर्घटना निदान मानवी चुकांमुळे तरी होणार नाहीत!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा