Advertisement

रावळी कॅम्पमधील भाडेकरुंचे पुनर्वसन तिथेच होणार


रावळी कॅम्पमधील भाडेकरुंचे पुनर्वसन तिथेच होणार
SHARES

रावळी कॅम्प येथील महापालिका सफाई कामगारांच्या वसाहतीतील दोन इमारती मोडकळीस आल्या असून, त्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या वतीने तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत येथील सर्व महापालिका कामगार भाडेकरूंचे तात्पुरते पुनर्वसन माहुलमध्ये करण्यात येत असल्यामुळे शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे यासर्व भाडेकरूंचे पुनर्वसन याच भागात करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. या भागात 39 रिकामी खोल्या असून, त्या ताब्यात घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्थायी समितीत दिले.

मुंबई महापालिका कामगारांची वसाहत असलेल्या एफ उत्तर विभागातील शीव कोळीवाडा रावळी कॅम्प येथील मोडकळीस आलेल्या इमारत क्रमांक ए-1 आणि ए-2 या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीसाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मागील बैठकीमध्ये हा प्रस्ताव आला असता येथील भाडेकरुंना घरे खाली करण्याच्या नोटीस पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत मंगेश सातमकर यांनी घरे खाली न केल्यास कारवाई केली जाईल, अशी धमकी दिल्याचे सांगत यासर्वांचे पुनर्वसन याच भागात करण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवला होता. मात्र बुधवारी झालेल्या सभेत हा पुन्हा प्रस्ताव आला असता विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सातमकर यांचे आभार मानले. येथील लोकांना माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या इमारतीमध्ये पाठवण्याची गरज नसून, अग्निशमन दलाच्या शेजारील इमारतींमध्येच तब्बल 40 खोल्या दोन वर्षांपासून पडून आहेत. त्यातील काहींना कुलुप लावली आहेत, तर काही रिकाम्या आहेत. त्यामुळे ज्या खात्याकडे या सदनिका आहेत, त्यांच्याकडून घेऊन त्या देण्यात याव्या, अशी मागणी रवी राजा यांनी केली. यावर मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीला गांभिर्याने घेत नसल्याची तक्रार करत आपण यापूर्वीच 39 खोल्या रिकाम्या असल्याची माहिती देऊनही त्या खोल्यांची माहिती दिली जात नाही. याच भागातील काही महापालिका इमारतींमध्ये घुसखोरी होत असल्याचे सांगत घुसखोरांच्या ताब्यातून या खोल्या घेण्यात याव्या, अशी सूचना त्यांनी केली. माहुलमध्ये शाळा, दवाखाने, बस तसेच अन्य कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे तिथे रस्त्यावर राहणारी लोकही तिथे जायला बघत नसल्याचे सांगितले.

मात्र, ही सर्व कुटुंबे महापालिकेच्या कामगारांची असल्यामुळे चेंबूरमधील पी.एल.लोखंडे मार्गावरील इमारतींमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्याची तयारी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दर्शवली. परंतु रवी राजा आणि मंगेश सातमकर यांनी एफ उत्तरमधील 40 रिक्त खोल्यांची जंत्री वाचून दाखवल्यानंतर सिंघल यांनी यासर्व खोल्यांचा अहवाल उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चौरे यांनी तयार करून पुढील बैठकीच्या आत सादर करावा, असे निर्देश दिले. यासर्व सदनिकांची माहिती प्राप्त झाल्यानंतर याच भागातील पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाईल, असे सिंघल यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.

संबंधित विषय