महारेरा नोंदणीकडे बिल्डरांची पाठ..कायद्याचा नाही धाक!

  Mumbai
  महारेरा नोंदणीकडे बिल्डरांची पाठ..कायद्याचा नाही धाक!
  मुंबई  -  

  राज्यात महारेरा कायदा लागू होऊन 80 दिवस उलटले असून आतापर्यंत केवळ 11 टक्के अर्थात 1100 प्रकल्पांचीच महारेरात नोंदणी झाली आहे. नोंदणीसाठी आता केवळ दहा दिवस उरले असतानाही बिल्डरांची नोंदणीसाठीची घाई अजूनही दिसत नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत किती प्रकल्पांची नोंदणी होणार? आणि नोंदणी न करणाऱ्या बिल्डरांविरोधात महारेरा कडक कारवाई करणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

  बांधकाम व्यवसायात पारदर्शकता आणत बिल्डरांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी राज्यात महारेरा कायदा लागू करत महारेरा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार 1 मे पासून कायद्याच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून 1 ऑगस्ट 2017 पर्यंत ओसी न मिळालेल्या जुन्या-नव्या प्रकल्पांच्या नोंदणीसाठी महारेराकडून 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. तर महारेरात नोंदणी असेल तरच बिल्डरांना प्रकल्पातील घरांची विक्री करता येणार आहे. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत बिल्डरांनी प्रकल्पांची नोंदणी करणे अपेक्षित आहे.

  मुंबईसह राज्यात ओसी न मिळालेल्या जुन्या-नव्या प्रकल्पांचा आकडा हा अंदाजे 10 हजाराच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. इतक्या मोठ्या संख्येने प्रकल्प असताना प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत 10 हजारापैकी केवळ 1100 प्रकल्पांची महारेरात नोंदणी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बिल्डर नोंदणीसाठी अजूनही पुढे येत नसल्याने बिल्डरांना महारेराच्या कायद्याचा वचक वाटत नाही का? असा सवालही सर्वसामान्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे 31 जुलैनंतरच महारेराला फाटा देणाऱ्या बिल्डरांविरोधात महारेरा काय आणि कशी कारवाई करते? हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.


  आतापर्यंत 1100 प्रकल्पांची तर 4500 एंजट्सची नोंदणी महारेरात झाली आहे. पुढच्या दहा दिवसांत नोंदणीचा आकडा वाढेल अशी अपेक्षा आहे. तर जे 31 जुलैपर्यंत नोंदणी करणार नाहीत, त्यांच्याविरोधात कायद्यानुसार कारवाई होईल. तर बिल्डरांना नोंदणीसाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.

  वसंत प्रभू, सचिव, महारेरा

  मुदतवाढ हवीय

  महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जींसह सरकारने याआधीच नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार नाही, असे वांरवार स्पष्ट केले आहे. मात्र तरीही काही बिल्डर आणि बिल्डरांच्या संघटना मुदतवाढीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे. तर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य आनंद गुप्ता यांनी मात्र आपल्या संघटनेने अशी कोणतीही मुदतवाढ मागितली नसून मुदतवाढीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. रेरा नोंदणीसाठी बिल्डरांनी आवश्यक ती तयारी केली असून आता दहा दिवसांत नोंदणीला वेग येईल आणि मोठ्या संख्येत नोंदणी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.  हेही वाचा

  'महारेरा' कायद्याचा गैरफायदाच जास्त?


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.