'महारेरा'चा पहिला दणका; 'साई रिअल इस्टेट'ला सुमारे सव्वा लाखाचा दंड

 Chembur
'महारेरा'चा पहिला दणका; 'साई रिअल इस्टेट'ला सुमारे सव्वा लाखाचा दंड

फसव्या, खोट्या बिल्डरांना दणका देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणा (महारेरा)ने महिन्याभरातच आपला इंगा दाखवला आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या चेंबूरच्या 'साई रिअल इस्टेट कन्सल्टंट' कंपनीला दणका दिला आहे. 'साई रिअल इस्टेट एजन्ट' म्हणून कंपनीची नोंदणी असताना 'साई रिअल इस्टेट कन्सल्टंट हा 'महारेरा' नोंदणी क्रमाक नोंदवत हावरे बिल्डर्सच्या प्रकल्पाची जाहिरात करणाऱ्या या कंपनीवर 'महारेरा'ने दंडात्मक कारवाई केली आहे. महारेरा कायद्याचे उल्लंघन आणि दिशाभूल केल्याप्रकरणी या कंपनीला 1 लाख 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती 'महारेरा'चे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी दिली आहे. इतकेच नव्हे, तर त्वरीत जाहिरात मागे घेण्याचे, जाहिरातीचे होर्डिंग्ज काढण्याचे आदेशही कंपनीला देण्यात आले आहेत. यापुढे 'महारेरा'मध्ये नोंदणी असेल त्याच बिल्डर आणि गृहप्रकल्पाची जाहिरात करता येईल, असेही 'महारेरा'ने आदेश दिल्याची माहिती चटर्जी यांनी यावेळी दिली आहे.

बिल्डर, एजंट आणि गृहप्रकल्प या सर्वांची 'महारेरा'मध्ये नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बिल्डर, एजंट आणि गृहप्रकल्पाची नोंदणी असेल तरच फ्लॅटची विक्री करता येणार आहे. त्याचवेळी बिल्डर, गृहप्रकल्प आणि एजंट अशा सर्वांचे 'महारेरा' नोंदणी क्रमांक जाहिरातीत नोंदवणेही आता बंधनकारक करण्यात आले आहे. हे क्रमांक असतील तरच जाहिरात करण्यात येणार आहे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जाहिरातीसाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आल्याचे वृत्त सर्वप्रथम 'मुंबई लाइव्ह'नेच दिले होते.


हेही वाचा - 

बिल्डरांनो सावधान ! 'महारेरा' नोंदणी क्रमांकाशिवाय गृहप्रकल्पाची जाहिरात कराल तर फसाल

महिन्याभरात केवळ 21 गृहप्रकल्पांची 'महारेरा'त नोंदणी

म्हाडाच्या प्रकल्पांनाही 'महारेरा'त नोंदणी बंधनकारक


'साई रिअल इस्टेट कन्सल्टंट' कंपनीने 'महारेरा'मध्ये नोंदणी केली आहे. असे असताना कोणत्याही प्रकल्पाची जाहिरात करताना या कंपनीने स्वत:च्या नोंदणीबरोबरच ज्या बिल्डरचा प्रकल्प आहे त्या बिल्डरचा नोंदणी क्रमांक तसेच गृहप्रकल्पाचा नोंदणी क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. मात्र या कंपनीने स्वत:चा नोंदणी क्रमांक नोंदवत जाहिरात केल्याची बाब समोर आली होती. तर बिल्डर आणि ठाण्यातील जो प्रकल्प होता त्या प्रकल्पाचीही नोंदणी झाली नव्हती. त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतीच्या वर्षा राऊत यांनी यासंबंधी 'महारेरा'मध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावत सोमवारी सुनावणीसाठी बोलावले होते. या सुनावणीदरम्यान कंपनीने दिशाभूल आणि फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने कंपनीला 'महारेरा'च्या अध्यक्षांनी मोठा दणका देखील दिला आहे. 'महारेरा'च्या या निर्णयाचे ग्राहक पंचायतीने जोरदार स्वागत करत यापुढे अशा फसव्या एजंटलाच नव्हे, तर बिल्डरलाही आळा बसेल, अशा विश्वास पंचायतीचे अध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, 'महारेरा'ची ही पहिली कारवाई अत्यंत महत्त्वाची आणि मोठी मानली जात आहे. तर आता या निर्णयामुळे 'महारेरा'ची धास्ती बांधकाम व्यवसायाला बसेल, असे मत बांधकाम क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

Loading Comments