म्हाडाच्या प्रकल्पांनाही 'महारेरा'त नोंदणी बंधनकारक

 Mumbai
म्हाडाच्या प्रकल्पांनाही 'महारेरा'त नोंदणी बंधनकारक

म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत कधी निघणार याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष लागले असताना अजूनही सोडत निघालेली नाही. म्हाडाचे मुंबई मंडळ आटापीटा करत घरे शोधून काढत घरांचा आकडा 1000 च्या घरात नेण्याच्या प्रयत्नात असून, त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आल्याने जूनमध्ये सोडत काढण्याचा मंडळाचा मानस होता. पण आता ही सोडत आणखी लांबणार आहे. कारण राज्यात नव्याने लागू झालेल्या महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणा (महारेरा)कडे म्हाडाला आपल्या प्रकल्पांसह नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी झाल्याशिवाय सोडत काढता येणार नाही. त्यामुळे नोंदणी झाल्यानंतरच सोडत काढण्यात येणार असून, त्यास आणखी किती काळ लागेल हे सांगता येणार नसल्याची माहिती म्हाडातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.

'महारेरा'नुसार नोंदणीधारक बिल्डरांनाच नोंदणी झालेल्या प्रकल्पातील घरे विकता येणार आहेत. तर दुसरीकडे म्हाडा, सिडकोसारख्या सरकारी यंत्रणांनाही हा नियम बंधनकारक आहे. या सरकारी यंत्रणाही घर विक्री करत असल्याने त्यांनाही नोंदणी बंधनकारक असून, प्रकल्पाचीही नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती 'महारेरा'चे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी दिली आहे. त्यामुळे आता म्हाडालाही 'महारेरा'त नोंदणी करावी लागणार असल्याने सोडतीस विलंब होणार आहे. म्हाडाच्या संबंधित विभागाकडून 'महारेरा'त नोंदणी करण्यासाठीच्या प्रक्रियेचा अभ्यास सुरू असून, लवकरच नोंदणी करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

दरम्यान, म्हाडासाठीही 'महारेरा'त नोंदणी लागू झाल्याने विजेत्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. कारण म्हाडाच्या प्रकल्पातही काही गोंधळ असेल, जसे की म्हाडाकडून घरांचा ताबा देण्यास विलंब होत असेल, ओसी मिळत नसल्याने ताबा मिळत नसेल, घरांचा दर्जा चांगला नसेल वा इतर कोणत्या तक्रारी असतील, तर त्या तक्रारींसाठीही सर्वसामान्यांना म्हाडाविरोधात महारेराकडे दाद मागता येणार आहे.


हेही वाचा - 

वर्षभरात म्हाडा उभारणार 14,440 घरं


Loading Comments