वर्षभरात म्हाडा उभारणार 14,440 घरं

  Mumbai
  वर्षभरात म्हाडा उभारणार 14,440 घरं
  मुंबई  -  

  मुंबई - पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडाच्या उपलब्ध जमिनींवरील घरबांधणी कार्यक्रमांतर्गत 2017-18 मध्ये म्हाडाने मुंबईसह राज्यभरात 14,440 घरांच्या निर्मितीचे उद्दीष्ट ठेवले आहे. बुधवारी म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत म्हाडाच्या 2017-18 च्या 6891 कोटी 45 लाखांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. हा अर्थसंकल्प 671 कोटी 28 लाख रुपये तुटीचा आहे. या अर्थसंकल्पांतर्गत म्हाडाने 14,440 घरांच्या निर्मितीचे उद्दीष्ट ठेवल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.

  म्हाडा घरबांधणी आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यभरात 14,440 घरे बांधण्यासाठी अर्थसंकल्पात म्हाडाने तब्बल 1596 कोटी 97 लाखांची तरतूद केली आहे. तर म्हाडाकडे सध्या घरबांधणीसाठी जागा शिल्लक नसल्याने खासगी जमिनी खरेदी करत त्यावर घरे बांधण्याचा निर्णय याआधीच म्हाडाने घेतला आहे. त्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली जाते. त्यानुसार यंदा त्यासाठी 97 कोटी 68 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून उपकरप्राप्त इमारतींच्या दुरूस्तीसाठी अर्थसंकल्पात 757 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीअंतर्गत वर्षभरात 679 इमारतींच्या दुरूस्तीचे उद्दीष्ट म्हाडाने ठेवले आहे.

  राजीव गांधी ग्रामीण आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाच्या सबसिडीसाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारतीच्या देखभाल-दुरूस्तीसाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईसह इतर मंडळाकडून काढण्यात आलेल्या सोडतीतील घरांच्या विक्रीतून 655 कोटींपर्यंतची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर यंदा घरविक्रीतून 4266 कोटी रुपये मिळतील असा अंदाज म्हाडाने वर्तवला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.