मुंबई उच्च न्यायालय: लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सुरक्षा घोषणा देण्याचे आदेश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वे प्राधिकरणाने सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वंदे भारत प्रमाणेच सार्वजनिक सुरक्षा घोषणा (safety announcement) सुरू कराव्यात आणि त्यात गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार आहे याची स्पष्ट माहिती द्यावी, अशी सूचना मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाने (bombay high court) केली आहे.

न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी मंगळवारी दिलेल्या निकालात प्रवाशांना धावती ट्रेन पकडण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करून आपला जीव धोक्यात न घालण्याचा इशाराही दिला.

10 वर्षांपूर्वी जळगाव (jalgaon) रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमधून उतरताना जखमी झालेल्या एका व्यक्तीला 80 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाने नमूद केले की, लोकल ट्रेनमध्ये डिस्प्ले बोर्ड किंवा उद्घोषणा असते की, ट्रेन कोणत्या स्थानकावर थांबणार नाही. मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या बाबतीत प्लॅटफॉर्मवर अशी यंत्रणा नसते.

जेव्हा गाडी कोणत्या स्थानकावर थांबणार नाही याची कोणतीही घोषणा केली जात नाही. तेव्हा अशा स्थानकावर उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा दोष मानला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

प्रवाशांनी धावत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे टाळावे. त्याऐवजी पुढच्या स्टेशनपर्यंत वाट पाहून आवश्यक तो दंड भरणे श्रेयस्कर आहे.

माणूस आपला जीव धोक्यात घालणारी पावले उचलू शकतो, पण नेमक्या त्याच वेळी मानसिक संतुलनाची परीक्षा असते. प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या मोठ्या हितासाठी हे आवश्यक आहे, असे न्या. जैन यांनी नमूद केले.

रोहिदास कुमावत यांनी रेल्वे दावा न्यायाधिकरणाच्या जानेवारी 2018 च्या आदेशाला आव्हान दिले होते. न्यायाधिकरणाने त्यांचा भरपाईचा दावा फेटाळला होता आणि ती जखम 'स्वतःहून ओढवून घेतलेली' असल्याचे म्हटले होते.

कुमावत मनमाड ते जळगाव असा गुवाहाटी एक्सप्रेसने प्रवास करत होते. जळगाव स्टेशन जवळ आल्यावर गर्दीमुळे त्यांचा हात निसटला आणि ते पडले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली.

रेल्वेचे म्हणणे होते की, जळगावला थांबा नसल्याचे समजल्यावर त्यांनी धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने रेल्वे प्राधिकरणाला कुमावत यांना 80 हजार रुपये भरपाई 12 आठवड्यांत देण्याचे आदेश दिले आहेत.

कुमावत हे ‘प्रामाणिक प्रवासी’ होते आणि जळगावला गाडी थांबेल या समजुतीने ते गाडीत चढले होते. गाडी थांबणार नाही हे समजल्यावर घाबरून घेतलेला निर्णय हा स्वतःला इजा करून घेण्याच्या हेतूने नसतो.


हेही वाचा

कोस्टल रोडवरील मेलोडी रोडवर बॅरिकेड लावणार :बीएमसी

14 वर्षांनंतर माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा

पुढील बातमी
इतर बातम्या