
कोस्टल रोडवरील ‘मेलोडी रोड’ (Musical Stretch) सुरू झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच आता हा रस्ता दर शुक्रवारी ते रविवारी रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत बॅरिकेड करण्यात येणार आहे. ब्रेच कँडी परिसरातील रहिवाशांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः ‘जय हो’ हे गाणं सतत वाजवल्यामुळे शांत निवासी भागात मोठा त्रास होत असल्याचं रहिवाशांनी सांगितलं.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत वाजणाऱ्या संगीतामुळे दैनंदिन जीवन अस्वस्थ झालं आहे. अनेकांनी सांगितलं की खिडक्या उघडणंही कठीण झालं असून, ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
ब्रिच कँडी रहिवासी मंचातील एका सदस्याने सांगितलं, “डेसिबल पातळी नियमांनुसार असली तरी ध्वनीचा प्रकार खूप त्रासदायक आहे. अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांपूर्वी प्रशासनाने नागरिकांशी चर्चा करायला हवी होती.”
रहिवाशांनी या मेलोडी रोडविरोधात मोहीम सुरू करत महापालिका आयुक्तांना पत्रही लिहिलं होतं.
बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितलं, “तक्रारीनंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी ब्रिच कँडी परिसरात जाऊन डेसिबल पातळी तपासली, जी 9 dB इतकी असून निवासी भागासाठी परवानगीयोग्य मर्यादेत आहे. मात्र रात्री हा आवाज अधिक त्रासदायक ठरत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी रात्री हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्याच्या इतर दिवशी हा रस्ता दिवसा आणि रात्री खुला राहील.”
बीएमसीने बुधवारीपासून ‘L’ आकारात छोटा भाग बॅरिकेड केला आहे, ज्यामुळे सर्व वाहने त्या भागातून जाऊ शकणार नाहीत. यामागे त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे.
भारतामधील पहिलाच ‘मेलोडी रोड’ 11 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला होता.
हेही वाचा
