
माहुल पंपिंग स्टेशनसाठी मिठागराची (salt pan) 6.176 एकर जागा देण्यास केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनने अखेर हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेल्या माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामुळे पावसाळ्यात कुर्ला, शीव (sion), चेंबूर (chembur) आदी भाग पाण्याखाली जाणार नाही अशी आशा निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे अतिशय कमी मोबदल्यात ही जमीन पालिकेला मिळाली आहे. या जमिनीसाठी 150 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.
मात्र अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून फक्त 15 कोटी रुपयांत ही जमीन पालिकेच्या ताब्यात घेतली आहे.
माहुल पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर गांधी मार्केट चेंबूर, सिंधी सोसायटी, नेहरु नगर, माटुंगा, कुर्ल्यासह सायन रेल्वे स्थानक लवकरच पूरमुक्त होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सखल भागात पाणी जमा होते आणि मुंबई ठप्प होते. मुंबई पूरमुक्तीसाठी मुंबई महापालिका प्रशासनाने 2006 मध्ये ब्रिमस्ट्रोवॅड सह अनेक प्रकल्प राबवत आहे.
हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रो, क्लिव्हलँड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पंपिंग स्टेशन उभारली आहेत.
तसेच गांधी मार्केट, चेंबूर, सिंधी सोसायटी, नेहरु नगर, माटुंगा कुर्ल्यासह सायन रेल्वे स्थानक पूरमुक्तीसाठी माहुल पंपिंग स्टेशन उभारणे गरजेचे आहे.
यासाठी पर्जन्य जलवाहिनी विभागाने माहुल पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा मिळवण्याकरिता पाठपुरावा करीत होते.
अखेर 14 वर्षांनंतर केंद्र सरकारने मिठागरची जागा देण्यास होकार दिला आहे.
माहुल पंपिंग स्टेशनसाठी पालिकेला 15,500 चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे, तर सॉल्ट कमिशनकडून मिठागराची 6,176 एकर जागा मिळणार आहे.
‘एमबीपीटी’ रोडच्या बाजूने माहुल खाडी, वडाळा येथे माहुल नाल्याजवळ हे पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे.
नाला, खाडी जवळ असल्याने अतिवृष्टीत या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी उपसून बाहेर फेकणे सोयीस्कर ठरणार आहे.
हेही वाचा
