आंदोलनामुळे शिवसैनिक चार्ज

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वाढत्या महागाईच्या विरोधात मुंबईतील शाखाशाखांमधून शिवसेनेच्या वतीने शनिवारी तीव्र आंदोलने झाली. मात्र, आजवर विरोधी पक्षात असल्यामुळे कायम आंदोलन करण्याची सवय असलेल्या शिवसेनेला सत्तेत सहभागी झाल्यामुळे एक प्रकारची मरगळ आली होती. ही मरगळ शनिवारच्या आंदोलनामुळे दूर होऊन शिवसैनिक एक प्रकारे चार्ज झाल्याचे दिसून येत आहे. सत्तेमुळे आंदोलन करता येत नाही. पण हे आंदोलन केल्यामुळे आज खऱ्या अर्थाने शिवसेनेची अस्त्र शस्त्र पाजळली गेल्याची चर्चा शिवसैनिकांमधून ऐकायला मिळत होती.

आंदोलन हाच ऑक्सिजन

गॅस दरवाढीसह पेट्रोल व जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या भडकलेल्या महागाईविरोधात, तसेच मोदी सरकारविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी शनिवारी मुंबईभर हे आंदोलन करून एक प्रकारे सरकारविरोधाचा भडका उडवून दिला आहे. १९९५ ते १९९९ वगळता शिवसेना पक्ष कधीही राज्याच्या सत्तेत नव्हता. त्यानंतर आता राज्यातील भाजपाच्या सत्तेत मित्र पक्ष म्हणून सामील झाला. परंतु, हा काळ वगळला तर शिवसेना पक्ष हा कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेतच आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आंदोलन हा एकमेव अजेंडा शिवसेनेचा होता आणि वांरवारच्या आंदोलनामुळे शिवसैनिक नेहमीच तेजतर्रार असायचा. त्यामुळे आंदोलन हाच शिवसैनिकांचा आॅक्सिजन असायचा.

मरगळ झटकली

मागील अडीच वर्षापासून शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिवसैनिकांना आंदोलन करता येत नव्हते. परंतु, शनिवारी हे आंदोलन हाती घेण्यात आल्यानंतर शिवसैनिक मोठ्या हिरीरीने, तसेच उत्साहाने त्यात सहभागी झाले होते. मुंबईतील प्रत्येक भागामध्ये, तसेच शाखाशाखांमधून सरकार आणि महागाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, तसेच प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात आले. पण या आंदोलनामुळे गेल्या काही महिन्यांपासून अंगात भिनलेली मरगळ दूर झटकली गेली. आम्ही चार्ज झालो आहोत, असेच शिवसैनिक बोलताना दिसत होते.

शिवसैनिक असल्याची जाणीव

सत्तेत सहभागी असतानाही आंदोलन केल्यामुळे शिवसेनेवर टीका होत आहे. त्यामुळे सत्ता ही महत्त्वाची नसून सत्तेतून बाहेर पडून या सरकारला सळो की पळा करू या, असा एक अाविर्भाव शिवसैनिकांमध्ये दिसत होता. त्यामुळे येणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात? याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. पण सत्तेतून बाहेर पडून शिवसेनेने आपली ताकद दाखवायला हवी, हीच कुजबुज आंदोलनातील सहभागी शिवसैनिकांकडून ऐकायला मिळत होती. या आंदोलनामुळे आम्हालाही आम्ही शिवसैनिक असल्याची जाणीव झाल्याचे महिला व पुरुष शिवसैनिक सांगत होते.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या