एलफिन्स्टन-टिळक पूल झाले जुने, पर्यायी पुलांची काय व्यवस्था?

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

दक्षिण मुंबईतील एलफिन्स्टन उड्डाणपूल, दादरचा टिळक उड्डाणपूल हे जुने झाले असून भविष्यात हे पूल पाडायचे झाल्यास पर्यायी पुलांची व्यवस्था काय? असा सवाल करत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी या दोन्ही पुलांसाठी पर्यायी पुलांची उभारणी करण्याची मागणी केली आहे.

'पर्यायी पुलांचा विचार करा'

माहिम कॉजवे येथील मिठी नदीवरील पुलाच्या बांधकामाबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता, सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी ही मागणी केली. ब्रिटिशांनी बांधलेल्या एलफिन्स्टन पूल आणि दादर टिळक पूल हे ब्रिटिशांनी बांधले आहेत. हे पूल फार जुने झाले असून या पुलांबाबत ब्रिटिश सरकारनेही आपल्याला पत्र पाठवून या पुलांचा कालावधी संपल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलांच्या जागेवर पर्यायी पूल बांधण्याबाबत प्रशासनाने विचार करावा. नाहीतर सावित्री पुलाप्रमाणे या पुलांची अवस्था होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

गोल्डन अवर्स जातो ट्रॅफिकमध्ये

टिळक पूल आणि एलफिन्स्टन पूल यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे एलफिन्स्टन पुलावरून केईएम रुग्णालयात किंवा दादर पूर्व भागातून हिंदुजा रुग्णालयात रुग्णाला दाखल करायचे असल्यास रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतच अडकून पडते. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी जे गोल्डन अवर्स असतात, तोच कालावधी ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने वाया गेल्यामुळे रुग्णाला जीव गमवावा लागतो, असे विशाखा राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मिठीनदीवरील पुलाचे बांधकाम केले जात असल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूला कोळी समाजाचे लोक राहत आहेत. त्यामुळे यात किती कुटुंबे बाधित होत आहेत? याची माहिती दिली जावी. तसेच या सर्वांचे सागरासंदर्भात उदरनिर्वाहाचे साधन असल्याने या सर्वांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी केले जावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी केले.

दादरच्या टिळक पुलावरील सिग्नल त्वरीत सुस्थित करा

टिळक पुलावर कोतवाल उद्यानाशेजारी बसवण्यात आलेल्या सिग्नलमुळे अनेक अपघात होत असल्याची बाब विशाखा राऊत यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिली. या ठिकाणी सिग्नल आहे, परंतु ते वाहनचालकांना दिसत नसल्याने अनेकदा लाल सिग्नल पडल्यानंतरही वाहन चालक सुसाट वेगाने गाड्या हाकतात. त्यामुळे हे सिग्नल सुस्थितीत बसवले जावेत, अशी मागणी त्यांनी केली.


हेही वाचा

शारदाश्रम शाळेची शरणागती; एसएससी बोर्डाचे प्रवेश सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या