Advertisement

शारदाश्रम शाळेची शरणागती; एसएससी बोर्डाचे प्रवेश सुरू

पालक आणि शिवसेनेच्या विरोधानंतर शारदाश्रम शाळा प्रशासनाने शरणागती पत्करली असून बंद केलेले एसएससी बोर्डाचे प्रवेश पुन्हा सुरू केलं आहे.

शारदाश्रम शाळेची शरणागती; एसएससी बोर्डाचे प्रवेश सुरू
SHARES

मुंबईतील दादरमधील शारदाश्रम या शाळेत राज्य शिक्षण मंडळाचा इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम बंद करून, आयसीएसई बोर्डात रुपांतर करण्याचा घाट शाळा व्यवस्थापन मंडळाने घातला होता. पंरतु, पालक आणि शिवसेनेच्या विरोधानंतर शारदाश्रम शाळा प्रशासनाने शरणागती पत्करली असून बंद केलेले एसएससी बोर्डाचे प्रवेश पुन्हा सुरू केलं आहे.


नेमक प्रकरण काय?

शारदाश्रम विद्यामंदिर ही शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न असलेली शाळा आहे. मात्र काही दिवसांपूर्वी शाळा प्रशासनाने पुढील वर्षांपासून मात्र ‘आयसीएसई’ या आंतरराष्ट्रीय मंडळाशी शाळा संलग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षांत पाचवीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयसीएसई’ने निश्चित केलेला अभ्यास करावा लागणार असल्याची माहिती शाळेने दिली होती. त्यासाठी यंदा चौथीतील विद्यार्थ्यांचा दाखला घेऊन पुढील वर्षी पालकांनी पाचवीसाठी नव्याने शाळेत प्रवेश घ्यावा, अशी सूचनाही शाळेनं केली होती.

पालकांचा विरोध

पालकांनी आक्षेप नोंदवत गेली चार वर्षे एका पद्धतीच्या आराखड्यानुसार अभ्यास केल्यानंतर पुढील वर्षांपासून अचानक मंडळ बदलणे योग्य नसल्याचं सांगितलं होतं. तसेच आम्हाला विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या शाळेतच शिकवायचं आहे. त्यामुळे शाळा प्रशासन आमच्यावर अशाप्रकारे दबाव टाकू शकत नाही, असंही पालकांनी सांगितलं होतं.


शाळा प्रशासनाने पत्करली हार

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या ८, ९ व १० मे पर्यंत एसएससी बोर्डाची प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. काही दिवसांपूर्वी चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीसाठी आयसीएसई बोर्डात प्रवेश घ्यावा, यासाठी शाळा प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकांनी केला होता. विशेष म्हणजे शाळा व्यवस्थापनाने चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीसाठी आयसीएसई बोर्डात प्रवेश घ्यावा, यासाठी पालकांकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितली होती. परंतु, शाळेच्या या निर्णयाला पालकांनी कोणताही प्रतिसाद न देता आपल्या पाल्याला आयसीएसई बोर्डात प्रवेश घेऊन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे पालकांनी केलेल्या संघर्षामुळे शाळा प्रशासनाने हार पत्कारली असल्याचे बोलल जात आहे.


शिक्षण विभागातर्फे शारदाश्रम शाळेला पत्रक

दरम्यान शिक्षण विभागातर्फे शारदाश्रम शाळेला सोमवारी ७ मे रोजी पत्रक देण्यात आलं असून या पत्रकात शारदाश्रम शाळेने एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम बंद करता येणार नाही, असं सांगितलं होतं. तसेच शारदाश्रम शाळेच्या नावात बदल करण्यासही शिक्षण समितीने मंजूरी दिलेली नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे शारदाश्रम शाळेला एसएससी बोर्डाचे प्रवेशप्रक्रिया नियमानुसार चालू करण्याचे आदेशही शिक्षण विभागातर्फे देण्यात आले होते.


गेल्या काही दिवसांपासून शारदाश्रम शाळेबाबत पालक आणि शिक्षण समितीच्या तक्रारी लक्षात घेता शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ७ मे रोजी परीपत्रकाद्वारे शारदाश्रम शाळेला कळवण्यातही आलं आहे.
- महेश पालकर, शिक्षणाधिकारी

शारदाश्रम शाळेने घेतलेल्या या निर्णयामुळे संतप्त झालेले २१० विद्यार्थी आणि त्यांचे पालक युवासेनेकडे आले होते. शारदाश्रम शाळेने घेतलेल्या या निर्णयाचं युवासेना आणि पालक प्रतिनिधी यांनी स्वागत केलं असून २१० विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
- साईनाथ दुर्गे, शिक्षण समिती सदस्य


हेही वाचा - 

शारदाश्रमच्या 'इंटरनॅशनल' शाळेला परवानगीच नाही!

दादरमधली 'शारदाश्रम' आता इतिहासजमा होणार!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा