Advertisement

शारदाश्रमच्या 'इंटरनॅशनल' शाळेला परवानगीच नाही!

शाळेला महापालिका शिक्षण विभागाने परवानगी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्याला चुकीची माहिती देणाऱ्या विभाग निरीक्षक(शाळा) अर्थात बिट ऑफिसर यांना त्वरीत निलंबित करण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

शारदाश्रमच्या 'इंटरनॅशनल' शाळेला परवानगीच नाही!
SHARES

दादरमधील डॉ. भवानी शंकर रोडवरील शारदाश्रम शाळेचे नाव 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' असे करण्यास शाळा व्यवस्थापनाने शिक्षण समितीला पत्र पाठवले असले, तरी प्रत्यक्षात या शाळेला महापालिका शिक्षण विभागाने परवानगी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्याला चुकीची माहिती देणाऱ्या विभाग निरीक्षक(शाळा) अर्थात बिट ऑफिसर यांना त्वरीत निलंबित करण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच मंजुरीपूर्व दिलेल्या सर्व परवानगी त्वरीत रद्द करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.


नव्या नावाने प्रवेश प्रक्रियाही सुरू!

शारदाश्रम विद्या मंदीर शाळा व्यवस्थापनाने मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवून या शाळेचे नाव 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' असे करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नावात बदल करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला असता, समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी हा प्रस्ताव नावात बदल करण्याचा असला तरी आपल्या शिक्षण विभागाने त्यांना 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' या नावाने परवानगीच देऊन टाकली असल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच या शाळेने 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल'च्या नावाने फलक लावून प्रवेश प्रक्रियाही सुरू केल्याचे सांगितले. त्यामुळे 'ही परवानगी देणारे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना निलंबित करून याची चौकशी करावी' अशी मागणी त्यांनी केली. तसेच दिलेल्या परवानगी रद्द करण्याची सूचनाही त्यांनी केली.


शाळा बदलली, पालकांना माहीतच नाही!

ही शाळा आंतरराष्ट्रीय केली जाणार अशी कोणतीही कल्पना पालकांना देण्यात आलेली नाही. रिझल्टच्या दिवशी मुलांना शाळेतून नाव काढून या इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याची सक्ती पालकांवर केल्यावर काही पालकांनी तक्रार केल्यानंतर ही बाब समोर आल्याचे दुर्गे यांनी सांगितले. तसेच, याची मान्यता देण्यापूर्वी जो गैरव्यवहार या प्रकरणात झाला आहे, त्याची चौकशी करून हा प्रस्ताव नामंजूर केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली.


विद्यमान शाळा बंद करण्याची परवानगी नाही

या शाळेचा अर्ज परवानगीसाठी आला होता आणि त्याला राज्य शिक्षण उपसंचालकांनी परवानगी दिल्यामुळे नवीन शाळेसाठी परवानगी दिल्याचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केले. मात्र विद्यमान शाळा बंद करण्यास परवानगी दिलेली नाही. याठिकाणी आरटीईअंतर्गत मैदानाची आवश्यकता असून त्याप्रमाणे तिथे २६१८ चौरस मीटर क्षेत्रफळाचे खेळाचे मैदान दाखवल्याने त्यांना ही परवानगी देण्यात आलेली आहे, असे त्यांनी सांगितले.


शिक्षण समिती अध्यक्षांचे कारवाईचे आदेश

शाळा व्यवस्थापनाने नवीन आंतरराष्ट्रीय शाळा जरूर सुरु करावी, परंतु विद्यमान शाळा बंद करून ती करता येणार नाही. याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव समितीपुढे मंजुरीला आहे. आणि त्याआधीच या शाळेला नवीन नावाने परवानगी देणे ही बाब गंभीर असून अशा प्रकारच्या दिलेल्या सर्व परवानगी त्वरीत रद्द करण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी दिले. तसेच ज्या बिट ऑफीसरने शिक्षणाधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली, त्या अधिकाऱ्याला त्वरीत निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यामुळे पुढील सभेपर्यंत केलेल्या सर्व कार्यवाहींचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत त्यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.



हेही वाचा

दादरमधली 'शारदाश्रम' आता इतिहासजमा होणार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा