Advertisement

म्हणून शारदाश्रम शाळेतील पालक संतप्त


म्हणून शारदाश्रम शाळेतील पालक संतप्त
SHARES

दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचं नाव एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल करण्याचा घाट शाळा व्यवस्थापनाने घातल्याने पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या शाळेत शिकत असलेल्या मुलांच्या पालकांना कुठेही विश्वासात न घेता हे नाव बदलून आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू केली जात आहे. त्यामुळे पालकांकडून याला तीव्र विरोध होत आहे. माध्यमिक शाळेचं नाव बदलण्यास मंजुरी मिळाल्याने इयत्ता चौथीच्या मुलांना आयसीएसई बोर्डाच्या शाळेत प्रवेश घेण्यास जबरदस्ती केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.



पालकांनी घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट

शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचं नाव बदलून एस. व्ही. एम. इंटरनॅशनल स्कूल केले जात असल्यानं या प्राथमिक शाळेतील पालकांनी विरोध दर्शवला आहे. शिक्षण समिती सदस्य सचिन पडवळ आणि साईनाथ दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १२५ पालकांनी प्रशासकीय अधिकारी सुभाष जाधव यांची भेट घेतली. यावेळी पालकांची मंजुरी घेऊनच हे नाव बदलले जात असल्याचं सांगितलं. पण प्रत्यक्षात पालकांनी याबाबत आपल्याला याची कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. केवळ तीन पीटीए मेंबरना विचारत हा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे.


यापूर्वीही झाला होता असाच प्रयत्न

सर्व पालकांनी स्वाक्षरी करून आयसीएई बोर्डाच्या शिक्षणाला विरोध केला आहे. माध्यमिक शाळेला उपसंचालकांनी दिलेली मान्यता ही १५ अटी आहेत. या अटींची पुर्तता शाळा व्यवस्थापन करू शकणार नसून यापूर्वी परळमधील शिरोडकर हायस्कूलमध्येही असाच प्रयत्न झाला होता. पण त्यांना या अटींची पूर्तता करता न आल्यामुळे त्यांची मान्यता रद्द झाली होती. त्यामुळे असा प्रकार या शाळेत होऊ शकतो, अशी भीती शिवसेना नगरसेवक सचिन पडवड यांनी व्यक्त केली आहे.


याची काळजी शिवसेना घेणार

इयत्ता चौथीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना व्यवस्थापन शाळेतून नाव काढायला सांगत असून इयत्ता पाचवीसाठी एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास जबरदस्ती करत आहे. माध्यमिक शाळेचे नाव बदलण्यास परवानगी मिळाली असली तरी प्राथमिक शाळेचे नाव बदलण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. तरीही मुलांचे ओळखपत्र आणि दैनंदिनी ही एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूलच्या नावानेच बनवलेली आहे. याबाबत दोन दिवसांमध्ये व्यवस्थापनाचा निर्णय कळवला जाईल, असं आश्वासन जाधव यांनी दिलं आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत हे नाव बदलून येथील मुलांना जबरदस्तीने आयसीएसईचं शिक्षण दिलं जाणार नाही, याची काळजी शिवसेना घेणार आहे, असं पडवळ यांनी सांगितलं.

शाळा व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये प्रचंड चिड आहे. युवा सेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पालकांचे नेतृत्व करून या शाळेतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद होऊ देणार नाही तसेच शारदाश्रमचे नावही बदलू देणार नाही, असं साईनाथ दुर्गे यांनी स्पष्ट केले.


असा प्रस्ताव मंजूर होणार नाही

शाळेचे नाव बदलण्याचा जर व्यवस्थापनाने निर्णय घेतला असेल तर त्याला मान्यता देता येवू शकते. पण शाळेच्या नावासह जर अभ्यासक्रमच बदलला जाणार असेल तर शिक्षण समिती निश्चितच यावर विचार करेल. ज्या पालकांनी आपल्या मुलांचा एसएससी बोर्डच्या अभ्यासक्रमासाठी शाळेत प्रवेश घेतला, त्याच मुलांना जर आता इंटरनॅशनल अभ्यासक्रमांची सक्ती केली जाणार असेल, तर असा प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही. तो प्रस्ताव फेटाळून लावला जाईल, असं शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी स्पष्ट केलं.


शारदाश्रमचे क्रिकेट कनेक्शन

शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचं नाव क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर घेतलं जातं. सचिन तेंडुलकर यांच्यामुळे ही शाळा खऱ्या अर्थाने नावारुपाला आली आहे. पण ही शाळा हॅरिस शिल्ड आणि गाईल्स शिल्ड विजेती राहायची. या शाळेला द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्यासारखे प्रशिक्षक लाभले होते. आचरेकर यांच्यामुळेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शारदाश्रम शाळेत प्रवेश घेतला होता. सचिनच्या पूर्वी चंद्रकांत पंडित आणि लालचंद लाजपूत, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवणारे क्रिकेटपटू याच शाळेत निर्माण झाले होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा