Advertisement

सुनील चिटणीस दहशतवादी आहेत का? शिवसेनेचा सवाल


सुनील चिटणीस दहशतवादी आहेत का? शिवसेनेचा सवाल
SHARES

मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि इतर कार्यालयांच्या आवारात शिवसेनेच्या महापालिका कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रशासनाने चिटणीस यांना ‘अवांच्छित व्यक्ती’ म्हणून घोषित करत त्यांच्यावर पुन्हा दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे चिटणीस यांनी कोणता गुन्हा केलाय? ते दहशतवादी आहेत का? असा सवाल शिवसेनेने करून त्यांच्यावर बंदी घालणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.



पुन्हा दोन वर्षांसाठी बंदी

शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे प्रशासनाला टार्गेट केलं. स्थायी समितीत उपस्थित केलेल्या मुद्दयांची उत्तरं प्रशासन देत नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय शिवसेनाप्रणित महापालिकेतील कामगारसेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांच्यावरील प्रवेशबंदी त्वरीत उठवण्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत आजतागायत उत्तर आलेलं नाही, असं सांगितलं. चिटणीस यांना प्रथम एक वर्षासाठी महापालिका रुग्णालय आणि कार्यालयांच्या आवारात बंदी घातली होती. पण त्यानंतर पुन्हा त्यांच्यावर दोन वर्षांसाठी बंदी घातली.


'ही' बंदी त्वरीत उठवा

जर एक वर्षासाठी शिक्षा केली होती, तर दुसऱ्यांदा त्यांना शिक्षा का आणि त्यांनी पुन्हा गैरकृत्य केलं होतं का? असा सवाल केला. जाणीवपूर्वक कुणाच्याही तक्रारींवरून त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही. आणि जर त्यांच्यावर कारवाई केली जात असेल, तर मग कामगार संघटनांच्या प्रतिनिधींवरही कारवाई का होत नाही? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे ही बंदी त्वरीत उठवा, अशी मागणी सातमकर यांनी केली.


'या' निर्णयाचा फेरविचार व्हावा

सुनील चिटणीस यांना केलेल्या प्रवेशबंदीचा समाचार घेत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी ते दहशतवादी आहेत का? असा सवाल केला. महापालिका म्हणजे काही पोलिस आहेत का त्यांना तडीपार करायला? त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार व्हायला हवा, असं सांगितलं. प्रत्येक पक्षांच्या कामगार संघटना आहेत, पण केवळ चिटणीस यांनाच जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं, असा आरोप त्यांनी केला.

चिटणीस यांच्यावर गैरसमजातून बंदी घातली जात असल्याचं सांगत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ते प्रचंड हुशार असल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याचं सांगितलं. त्यामुळे या शिक्षेबाबत फेरविचार करून ती रद्द केली जावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा