मुंबई महापालिकेच्या स्थायी, शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची बाजी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेच्या स्थायी सभापती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं शिवसेनेचा विजय सुकर होऊन भाजपचा पराभव झाला आहे. 

मुंबई महापालिकेच्या स्थायी सभापती आणि शिक्षण समितीची निवडणूक सोमवारी पार पडली. दोन्ही पदांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेसने उमेदवार उभे केले होते. स्थायी समितीत शिवसेनेकडे ११, भाजप १०, काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक असे संख्याबळ होते. शिक्षण समितीची निवडणुकीत ऐन वेळी नाट्यमय घडामोडींना वेग आला. 

राज्यातील महाविकास आघाडीत वितुष्ट नको म्हणून काँग्रेसने आज महापालिकेतील शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. तसंच मतदानाच्या वेळी काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेला मतदान केले.  त्यामुळं शिवसेनेच्या संध्या दोशी यांची अध्यक्षपदी निवड झाली. भाजपाच्या सुरेखा पाटील यांचा संध्या दोशी यांनी पराभव केला आहे. 

शिक्षण समिती शिवसेनेकडे गेल्यानं स्थायी समितीत शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढले. काँग्रेसच्या उमेदवाराने तिथंही माघार घेतल्यानं शिवसेनेचा मार्ग सुकर झाला. शिवसेनेचे यशवंत जाधव पुन्हा एकदा स्थायी समिती अध्यक्षपदी निवडून आले. स्थायी समितीसाठी भाजपकडून मकरंद नार्वेकर, शिवसेनेकडून यशवंत जाधव मैदानात होते.


हेही वाचा

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केली कारोनावर मात

रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल- देवेंद्र फडणवीस


पुढील बातमी
इतर बातम्या