निराधारांच्या आयुष्यात ‘स्माईल प्लस’

  • सुशांत सावंत & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एक  लहानशी वाटणारी घटना प्रसंगी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात नवं ध्येय देऊ शकते. प्रसाद चव्हाण यांच्या बाबतीत हे घडलंय. सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे आठ तास नोकरी करण्यात समाधान मानणारे प्रसाद चव्हाण आता जबाबदार सामाजिक भान जपणाऱ्या  मुंबईकराच्या भूमिकेत  शिरले आहेत. त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा दिली बबन सणस या निराधार वृद्धाने. प्रसाद चव्हाण आता 'स्माइल प्लस सोशल फाउंडेशन'चे या सेवाभावी संघटनेचे सदस्य झाले आहेत.   

कोण बबन सणस?

जीवाला जीव देणारी न मला माणसे भेटली,

काळजाला फक्त चिरणारी मला माणसे भेटली

सुरेश भटांच्या कवितेतले हे शब्द प्रत्यक्षात जगावे लागणारे असंख्य निराधार मुंबईच्या विविध भागांत पहायला मिळतात. त्यापैकीच एक बबन सणस हे 70 ते 75 वर्षीय वृद्ध. गेली पाचेक वर्षात त्यांना आपल्यापैकी अनेकांनी  बोरिवली रेल्वे स्थानकपरिसरात  विमनस्क अवस्थेत भटकताना पाहिलं असेल. प्रसाद चव्हाण यांना मात्र त्यांचा पत्ता शोधावंसं, त्यांचा भूतकाळ जाणून घ्यावंसं वाटलं. पुण्याच्या हातवे बुद्रुकचे रहिवासी असलेले बबन सणस हे 35 वर्षांपूर्वी काहीतरी वादामुळे घराबाहेर पडल्याचा तिथल्या पोलीस पाटलांचा प्राथमिक अंदाज.  गेली काही वर्ष बबन सणसांचं घर होतं रस्ते आणि रेल्वेचं प्लॅटफॉर्म.

नाही पसरली झोळी

या आजोबांचे वैशिष्टय म्हणजे त्यांनी कधीही कुणाकडे भीक मागितली नाही. न मागता जो कुणी खायला देईल ते खायचे आणि उदरनिर्वाह करायचा, असा या आजोबांचा नित्याचा दिनक्रम. हा दिनक्रम पाहणाऱ्या प्रसाद चव्हाण यांना दोन दिवसांपूर्वी या आजोबांची प्रकृती खालावलेली दिसली. त्यांच्या पायाला आलेली सूज पाहून त्यांनी निराधार आजोबांना आधार देण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईतल्या आश्रम शाळांमध्ये कुठेची आजोबांची व्यवस्था होऊ न शकल्याने प्रसाद यांनी थेट ‘स्माईल प्लस फाऊंडेशन'चे अध्यक्ष योगेश मालखरे यांच्याशी संपर्क करून आजोबांची राहण्याची व्यवस्था केली.

सामान्य नोकरदार ते समाजसेवक

स्माइल प्लस फाउंडेशनचं काम पाहून प्रभावित झालेल्या प्रसाद चव्हाण यांनी स्वतः या संस्थेचं सदस्यत्व घेतलं. सध्या ते करत असलेली नोकरी सांभाळून ते आता स्वयंसेवी संघटनेच्या कामात खारीचा वाटा उचलणार आहेत. 

मी गेल्या काही महिन्यांपासून या आजोबांना पाहत होतो. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी मी त्यांना पाहिले आणि त्यांची प्रकृती थोडी नाजूक दिसली. त्यांच्या पायाला सूज आली होती. त्यामुळे मी त्यांना सोबत घेण्याचा निश्चय केला.

प्रसाद चव्हाण, सदस्य स्माईल प्लस सोशल फाउंडेशन

आजोबांची किनारा आश्रमात व्यवस्था 

मुंबईच्या आश्रमांमध्ये आजोबांची व्यवस्था होऊ न शकल्याने या संस्थेने आजोबांची निगडीतील किनारा या आश्रमात रहाण्याची व्यवस्था केली. मूळात या आजोबांचे सख्खे नातेवाईक त्यांच्या गावात राहत नसल्याने त्यांच्या मुलीचा शोध ही संस्था घेत आहे.

आम्ही अशा निराधारांना आधार देण्याचं काम करतो. जवळपास 14 महिन्यांमध्ये आम्ही 285 निराधारांना विविध आश्रमांमध्ये आधार देण्याचे काम केले आहे. आमचं हे कार्य कायम सुरु राहील. जर कुणी असे निराधार आढळ्यास 8485808080/9892056723 या क्रमांकावर संपर्क साधा. सरकारनेसुद्धा याकामी शक्य तितकी मदत करावी, असं आम्हाला मनापासून वाटतं.

योगेश मालखरे, अध्यक्ष, स्माईल प्लस फाऊंडेशन


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या