बजरंगबलींच्या आज्ञेमुळे मुंबईतल्या ट्रेन लेट!

Borivali
बजरंगबलींच्या आज्ञेमुळे मुंबईतल्या ट्रेन लेट!
बजरंगबलींच्या आज्ञेमुळे मुंबईतल्या ट्रेन लेट!
See all
मुंबई  -  

मंगळवारी सकाळी 10 वाजता बोरिवली ते वांद्रे रेल्वे स्टेशनपर्यंतचा वीजप्रवाह तब्बल पाऊण तास म्हणजेच 45 मिनिटे खंडित करण्यात आला होता. त्यामुळे या काळात 4 ट्रेन रद्द करण्यात आल्या, तर 40 ट्रेन उशीराने धावत होत्या. आणि हे सगळं झालं ते बजरंगबलीमुळे! आता तुम्ही म्हणाल की बजरंगबलींचा ट्रेन लेट करण्यात काय संबंध? पण ज्या तरुणामुळे हा सगळा प्रकार घडला, त्या तरुणाचं तरी किमान हेच म्हणणं होतं.


खांबाच्या टोकावर शाम...

25 वर्षांचा शामभाऊ पासवान हा तरुण बोरिवली रेल्वे स्टेशन परिसरात आला, तेव्हाच तो काहीसा विचित्र वागत असल्याचं दिसत होतं. पण त्याच्याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नाही. पण काही वेळाने शाम अचानक बोरिवली रेल्वे स्टेशनच्या खांबावरच चढला! यावेळी तो स्वत:शीच बोलत होता. काय बोलत होता, हे मात्र कुणाला कळलं नाही. पण त्याचा तो अवतार पाहून प्रवाशांची मात्र घाबरगुंडी उडाली. काही प्रवासी त्याला खाली उतरण्यासाठी विनवू लागले.


रेल्वे पोलिसही गोंधळले...

एकीकडे हा सगळा प्रकार सुरु असताना दुसरीकडे एका प्रवाशाने प्रसंगावधान दाखवत स्टेशन मास्तरांशी संपर्क साधला. यानंतर लागलीच स्टेशन मास्तर रेल्वे पोलिसांसोबत घटनास्थळावर हजर झाले. समोर चाललेला प्रकार पाहून रेल्वे पोलिसही क्षणभर अवाक् झाले. त्यांनीही मग शामला खाली उतरायला सांगितलं. पण शाम मात्र काही ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हता.


काय होती बजरंगबलींची आज्ञा!

'तू वर का चढला आहेस?' या रेल्वे पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला शामने दिलेलं उत्तर ऐकून मात्र पोलिसही गोंधळून गेले. 'आपल्याला बजरंगबलींनी या खांबावर चढायला सांगितलं आहे' असं शामने पोलिसांना सांगितलं. रेल्वे पोलिसच काय, तो दुसऱ्या कुणाचंही ऐकत नव्हता. शेवटी स्टेशनवरचे काही कर्मचारी एका बाजूने खांबावर चढले. त्यांनी शामला त्याच्याच पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. एवढं सगळं झाल्यानंतर अखेर थेट 'बजरंगबलीं'च्या आदेशाने खांबावर चढलेला शाम खाली उतरला.


चक्रावलेले मुंबईकर!

शामला ताब्यात घेतल्यानंतर तो मनोरुग्ण असल्याचं आरपीएफच्या ध्यानात आलं. त्यामुळे त्याच्यावर अधिक कठोर कारवाई न करता त्याला सोडून देण्यात आलं. पण शामच्या या 'बजरंगबली ऑर्डर'ने चाकरमाने मुंबईकरांचे मात्र हाल झाले. 45 मिनिटे चाललेल्या या नाट्यामुळे 4 ट्रेन रद्द कराव्या लागल्या, तर 40 ट्रेन त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा उशीराने धावत होत्या. शिवाय प्रवाशांना याची सुतराम कल्पना नसल्यामुळे ती  45 मिनिटे गोंधळातच गेली. 'आम्ही जर वीजप्रवाह खंडित केला नसता, तर खांबावर चढलेल्या शामचा मृत्यू झाला असता' अशी प्रतिक्रिया नंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.हेही वाचा -

अखेर पवईतला विकृत गजाआड

4जी गाडीमुळे सापडला 'तो' विकृत!


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.