महापालिका रुग्णालयांतील रुग्णांचे ‘टाके’ बसेनात

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

महापालिकेच्या रुग्णालयांसह प्रसुतीगृहं आणि दवाखान्यांमध्ये करण्यात येणाऱ्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणारे स्युचर्स (टाक्यांकरता वापरण्यात येणारा धागा) उपलब्ध नसल्यानं चक्क रुग्णांच्या नातेवाईकांनाच मनस्ताव सहन करावा लागत अाहे. नातेवाईकांनाच अशाप्रकारचे स्युचर्स बाहेरील दुकानातून आणण्यासठी हातात चिठ्ठी टेकवली जात आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार आणि त्यासाठीचं औषध उपलब्ध करून दिलं जात असताना रुग्णांच्या नातेवाईकांवरच अाता ऑपरेशनकरता लागणारा हा धागा बाहेरून अाणण्याची वेळ अाली अाहे.

बहुतेक अौषधांची विक्रीच नाही

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालय, प्रसुतीगृह आणि दवाखान्यांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार देतानाच रुग्णांना १६ अनुसूचीवरील औषधेही मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र, या अनुसूचीवरील बहुतांशी औषधंच उपलब्ध नसल्यानं त्यांची खरेदी केली जात नाही. बदलते आजार आणि रोगांचा विचार करता या अनुसूचीवरील औषधे बदलण्याची मागणी नगरसेवकांकडून वारंवार केली जात आहे. शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल या सातत्यानं अनुसूचीवरील औषधांची यादी सुधारित करून नवीन औषधांचा त्यात समावेश करण्याची मागणी करत आहे.

नातेवाईकांना अाणावी लागतात अौषधं

टाक्यांचे धागे अर्थात सर्जिकल स्युचर्स बाहेरुन आणायला लावले जात असताना रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ उडत अाहे. शीव रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाईकानं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती देताना शस्त्रक्रियेसाठी लागणारं सर्व साहित्य आपण बाहेरील औषधाचा दूकानातून आणून दिल्याचं सांगितलं. मात्र, समाजसेवकाच्या मते, ही औषधं महापालिका स्वत:च उपलब्ध करून देत असताना, तुम्ही बाहेरून का खरेदी करता, असा सवाल केला.

प्रस्ताव नामंजूर

महापालिकेच्या या रुग्णालयांमध्ये खरेदी करण्यात येणाऱ्या औषध खरेदीचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिला होता. त्यानंतर पुन्हा आणखी एक औषध खरेदीचा प्रस्ताव मंजुरीला आला असता तो नामंजूर केला होता. त्यामुळे आता स्थायी समितीही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध खरेदीबाबत गंभीर नसून यामुळे होणाऱ्या विलंबामुळे रुग्णांना बाहेरुन औषधे खरेदी करावी लागत आहेत.

कंत्राटदाराकडून विलंब

महापालिकेच्या वैद्यकीय रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही औषध खरेदीचे कंत्राट संपुष्ठात आल्यानंतर संबंधित रुग्णालयांच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या औषधांची ख्ररेदी केली जाते. त्यामुळे नवीन कंत्राट होईपर्यंत कुठेही औषधांची कमतरता नसते. परंतु बऱ्याचदा या कंत्राटदारांकडून पुरवठा होण्यास विलंब होता,अशाप्रकरणी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन आणण्यास सांगितले जाते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा -

लॅपटॉप तोंडावर फुटला; २५ शस्त्रक्रियेनंतर वाचला जीव

आता केवळ ४० हजारांत स्टेंट, तर ९० हजारांत गुडघ्याचं प्रत्यारोपण!

पुढील बातमी
इतर बातम्या