वसई-विरारमधील हॉटेल्सवर टांगती तलवार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे वसई-विरार (virar) शहरातील हॉटेल (hotels) उद्योग मोठ्या संकटात सापडला आहे.

वसई विरार (vasai road) शहर परिसरात एकूण सुमारे 1500 हॉटेल्स असून त्यापैकी 300 बार-रेस्टॉरंट्स आहेत. गेल्या आठवडाभरापासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्यामुळे आतापर्यंत सुमारे 30 टक्के हॉटेल्सने आपले दरवाजे बंद केले आहेत.

तसेच पुढील दोन दिवसांत हा आकडा 60 टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हॉटेल व्यावसायिकांच्या मते, गॅसशिवाय स्वयंपाक करणे अशक्य असल्याने अनेकांना व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

हॉटेल संघटनेचे सचिव विहंग म्हात्रे यांनी सांगितले की, येत्या 24 तासांत किमान 50 टक्के गॅस सिलिंडरचा पुरवठा झाला नाही, तर सर्व हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.

दरम्यान, पालघर जिल्हा प्रशासनाकडून हॉटेल उद्योगासाठी गॅस पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या गॅस पुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्याने हॉटेल मालकांसह हजारो कामगारांच्या रोजगारावर गंभीर संकट निर्माण झाले आहे.

गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल्सकडून पर्यायी उपाययोजना करण्यात येत आहेत. काही ठिकाणी इंडक्शन कुकर व इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर वाढवण्यात आला आहे.

गॅस सिलेंडरचा (gas cylinder) वापर करून तयार केले जाणारे जास्तीत जास्त पदार्थ तात्पुरते मेन्यूमधून वगळले जात आहेत.

तसेच उर्वरित गॅस वाचवण्यासाठी काही स्वयंपाकघर फक्त गर्दीच्या वेळेतच चालवली जात आहेत.

मात्र ज्यांना पर्यायी साधने उपलब्ध नाहीत किंवा गॅस मिळू शकलेला नाही, अशा अनेक हॉटेल मालकांना हॉटेल्स अनिश्चित काळासाठी बंद ठेवावी लागली असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.


हेही वाचा

रेल्वे स्थानकांवर कॅफे साऱख्या सुविधा मिळणार

महाराष्ट्रात वादळाचा अंदाज

पुढील बातमी
इतर बातम्या