'या' रिंग रोडमुळे बदलापूरहून थेट पनवेल गाठता येणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बदलापूर (badlapur) येथील कात्रप ते खरवई या रिंगरोडच्या (ringroad) रखडलेल्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ज्युवेली ते खरवईपर्यंतच्या दीड किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन अखेर पार पडले.

37 कोटींचा निधी खर्च करत तयार होणाऱ्या या कामामुळे वाहतूककोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे.

बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत - मुंबई (mumbai) राज्य महामार्गावर अवजड आणि चाकरमान्यांच्या वाहनांची भर पडत चालली आहे.

त्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून राज्य महामार्गावरील कात्रप ते खरवई या रिंगरोडचे काम आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नानंतर 'एमएमआरडीए'कडून (mmrda) करण्यात येत आहे.

कात्रप ते ज्युवेलीपर्यंतचा तीन किलोमीटर लांबीच्या चार पदरी रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र गेली काही वर्षे ज्युवेली ते खरवईपर्यंतच्या रस्त्याचे काम अडकले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही या रस्त्याचा पूर्ण क्षमतेने वापर सुरू होऊ शकला नव्हता.

अखेर काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या उर्वरित कामासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यात आला. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गेल्या महिन्यांत निविदा मंजुरीनंतर रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.

तसेच 37 कोटी रुपयांच्या निधीतून उर्वरित दीड किलोमीटर रस्त्यांचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाणार असल्याची माहिती या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.

या रिंगरोडमुळे कर्जत (karjat) - मुंबईवरील अवजड आणि लहान वाहनांना बदलापूरमध्ये प्रवेश न करता थेट वाडा मार्गावरून खरवई मार्गे पुढे मुंबई - बडोदा महामार्ग आणि पनवेल (panvel) गाठण्यासाठीही हा रस्ता उपयोगी ठरणार आहे.


हेही वाचा

मुंबईतील 'या' भागात गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस

विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाचे 86% काम पूर्ण

पुढील बातमी
इतर बातम्या