मुंबईच्या मुलुंड भागात शनिवारी ( 29 नोव्हेंबर 2025) झालेल्या एका भीषण अपघातानंतर, बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या एम/एस उबर इंडिया सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड (M/S. UBER INDIA SYSTEMS PRIVATE LIMITED) कंपनीच्या संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) तक्रारीवरून नवघर पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात उबर बाईकवरील महिला प्रवासी शुभांगी सुरेंद्र मगरे (वय 49) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामुळे ॲप-आधारित प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील ऐरोली जंक्शन, ऐरोली फ्लायओव्हर ब्रिजखालील परिसरात हा अपघात झाला. या घटनेनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई पूर्व (वडाळा) येथील मोटार वाहन निरीक्षक रविंद्र गावडे यांनी नवघर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी उबर कंपनीचे संचालक तसेच मिक्सर ट्रकचा चालक जवाहीर बशराज यादव यांना आरोपी म्हणून सूचीबद्ध केले आहे.
अपघाताचे कारण आणि गंभीर आरोप
तक्रारदार रविंद्र गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जवाहीर यादव याने त्यांच्या ताब्यातील मिक्सर ट्रक (एम. एच. 43 बी.जी. 6282) अत्यंत भरधाव वेगाने, हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवला. यामुळे त्याने विनापरवाना उबर कंपनीमार्फत चालवण्यात येणाऱ्या खासगी मोटारसायकलला (एम. एच. 03 ई. एम. 4233) मागून जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारसायकल चालक गणेश विश्राम माधव यांना गंभीर दुखापत झाली, तर प्रवासी महिला शुभांगी सुरेंद्र मगरे यांचा जागीच मृत्यू झाला.
उबर कंपनीवर काय ठपका?
या तपासात उबर कंपनीच्या बेकायदेशीर कामांचा पर्दाफाश झाला आहे. अपघातात वापरलेली मोटारसायकल (एम. एच. 03 ई. एम. 4233) ही प्रत्यक्षात दुसऱ्या ॲक्टिव्हा स्कूटरच्या (एम. एच. 47 यु. 4836) नोंदणीवर चालवली जात होती आणि तीच विनापरवाना उबर कंपनीला रजिस्टर करण्यात आली होती.
मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 66 नुसार खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. असे असतानाही, उबर कंपनीने या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरूच ठेवली.
केवळ इतकेच नाही, तर कंपनीने चालकांची चारित्र्य पडताळणी (Police Verification) किंवा इतर आवश्यक सुरक्षात्मक तपासणीही केली नसल्याचे आढळून आले आहे. कंपनीच्या या निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा