पश्चिम रेल्वेने (western railway) मुंबईतील (mumbai) आपल्या स्थानकांवरील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर लक्ष ठेवण्यासाठी विशिष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
रेल्वे स्थानकांसारख्या जास्त वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन व्यवस्थेअंतर्गत, स्टेशन मास्तर आणि स्टेशन अधीक्षक आपापल्या स्थानकांसाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.
रेल्वेच्या हद्दीत मोकाट कुत्रे आढळल्यास परिसरावर देखरेख ठेवणे, तक्रारींना प्रतिसाद देणे आणि नागरी अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे ही त्यांची जबाबदारी असेल, असे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.
भटक्या कुत्र्यांना (stray dogs) स्थानक परिसरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
तसचे ते प्राप्त झालेल्या तक्रारी आणि केलेल्या कारवाईचा तपशील ठेवतील, तसेच आवश्यकतेनुसार विभागीय अधिकाऱ्यांना अनुपालन अहवाल सादर करतील.
प्रवाशांना तक्रारी करणे सोपे जावे यासाठी, नियुक्त अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क तपशील स्थानकांवर प्रदर्शित केले जाण्याची शक्यता आहे.
रेल्वे स्थानके, बस टर्मिनल्स, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या निर्देशांनुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
तसेच त्यानंतर पश्चिम रेल्वेने सुमारे 10 दिवसांपूर्वी, आपल्या मुंबई (mumbai) विभागांतर्गत येणाऱ्या स्थानकांना एक अंतर्गत परिपत्रक जारी केले.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक विभागांमध्ये समन्वयाची वाट पाहण्याऐवजी तक्रारी स्थानिक पातळीवरच हाताळल्या जाव्यात, हा या नवीन प्रणालीचा उद्देश आहे.
स्टेशन स्तरावरील नोडल अधिकारी आवश्यक कारवाईसाठी संबंधित पालिका वॉर्ड अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधतील.
पश्चिम रेल्वेने चर्चगेट आणि बोरिवली दरम्यानच्या पश्चिम मार्गालगतच्या भागांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 25 ते 30 पालिका प्रभाग अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे परिसरातून कुत्र्यांना ओळख पटवून पकडल्यानंतर, त्यांना ताब्यात घेण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल.
रेल्वे प्रशासन भटक्या कुत्र्यांच्या दिसण्याबाबत आणि तक्रारींबाबत स्थानकनिहाय माहिती ठेवण्याची योजना आखत आहे.
हेही वाचा