'हा' उन्नत मार्ग कोणत्याही समारंभाविना वाहतुकीस खुला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळं मुंबईतील रस्त्यांवर प्रचंड वाहतुककोंडी निर्माण होत आहे. या वाहतुककोंडीतून मुंबईकरांचा प्रवास जलद व्हावा यासाठी महत्वाच्या रस्त्यांवर उड्डाणपूल बांधण्यात आली आहेत. दरम्यान, आता बीकेसी ते चुनाभट्टी असा प्रवास करणाऱ्या प्रवासांचा प्रवास ही जलद होणार आहे. कारण वांद्रे-कुर्ला-संकुल (बीकेसी) ते चुनाभट्टी उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

समारंभाविना वाहतुकीस खुला

वांद्रे-कुर्ला-संकुल (बीकेसी) ते चुनाभट्टी हा उड्डाणपूल रविवारी संध्याकाळी कोणत्याही समारंभाविना वाहतुकीस खुला करण्यात आला. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला असल्याची घोषणा काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या उड्डाणपुलामुळे धारावी आणि सायन जंक्शन दरम्यान होणाऱ्या वाहतूककोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाहनधारकांचा तब्बल ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

वाहतूक सुकर

चौपदरी असलेल्या बीकेसी ते चुनाभट्टी उड्डाणपुलामुळे ठाणे-नाशिक आणि पनवेल-पुण्याकडे जाणारी वाहतूक सुकर होणार आहे. हा उन्नत मार्ग बीकेसी, बाबुभाई कंपाउंड, सायन सेंट्रल रेल्वे, डंकन कॉलनी, हार्बर लाइन (चुनाभट्टी स्टेशन), सोमय्या मैदान असा असून, मुंबईकरांचे जीवनमान सुकर करण्यासाठी हे आणखी एक पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

उद्घाटनासाठी बंद

बीकेसी ते चुनाभट्टी हा उड्डाणपूल तयार असूनसुद्धा केवळ उद्घाटनाला वेळ मिळत नसल्यानं बंद ठेवल्याचा आरोप करत, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी ऐन दिवाळीत आंदोलन केलं होतं. दरम्यान, हा उड्डाणपूल एमएमआरडीएमार्फत शनिवारी सुरू होणार होता. मात्र, या पुलाची काही कामं शिल्लक असल्यानं, ही कामं पूर्ण झाल्यावरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देशही मलिक यांनी शनिवारी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिले होते.

३० मिनिटं वाचणार

या उड्डाण पुलासाठी एमएमआरडीएनं २०३ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसंच, १.६ किमी लांबीच्या या उड्डाणपुलावरून अवघ्या काही मिनिटांमध्ये बीकेसीतून चुनाभट्टीमध्ये पोहोचणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळं या आधी या प्रवासाला लागणाऱ्या वेळेत तब्बल ३० मिनिटांची बचत होणार आहे.


हेही वाचा -

शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

पहिली 'लेडीज स्पेशल' ट्रेन धावली मुंबईत


पुढील बातमी
इतर बातम्या