सॅनिटरी नॅपकिन्स GST तून वगळा, लातूरकर महिलेचे मुंबईत उपोषण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

40 वर्षीय छाया काकडे, या गेल्या 6 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांची मागणी फक्त एकच जीएसटी मुक्त सॅनिटरी नॅपकीन्स. लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात आंदोलन, जनजागृती करून छाया काकडे यांनी आपला मोर्चा थेट मुंबईकडे वळवला. पण, मुंबईत त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

महाराष्ट्रात फक्त 12 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. पण, परदेशात हीच संख्या 93 टक्के इतकी आहे. 15 ते 54 वयो गटातील 300 दशलक्ष मुली आणि महिलांचा हा प्रश्न आहे. म्हणून आपण उपोषणाला बसलो आहोत, असे सामाजिक कार्यकर्त्या छाया काकडे यांनी स्पष्ट केले आहे.


कोण आहेत छाया काकडे ?

छाया काकडे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. विचारधारा ग्रामीण विकास संस्थेत त्या कार्यरत आहेत. वयाच्या 18 व्या वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्य करायला सुरुवात केली. गेली 2 वर्षे त्या सॅनिटरी नॅपकिन्सबाबतची जनजागृती गावागावांत करत आहेत. 

त्यांचे म्हणणं आहे की, ज्या गावात अजूनपर्यंत एसटी पोहोचली नाही, तिथे हे सरकार जीएसटी लागू करण्याचा विचार करत आहे. अशाने नेमका कुणाला फरक पडणार असाच प्रश्न या निमित्ताने पडतो.

छाया काकडे यांची ओळख फक्त सामाजिक कार्यकर्त्या अशीच नाही तर, त्या एक ‘बिझनेस वूमन’ देखील आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन तीन महिन्यांचं सॅनिटरी नॅपकिन्स कसे बनवायचे यासाठी ट्रेनिंग घेतले आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या लातूर जिल्ह्यात बिल गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने 6 महिन्यांत 300 महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे इथल्या महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

ज्या मशीन अमेरिकेत पुरुष चालवतात, त्या मशीन लातुरात महिला चालवतात असेही छाया काकडे यांनी सांगितलं. लातूर या जिल्ह्यात जवळपास 1800 महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे. या महिलांना ‘रिफ्रेश’ या संस्थेकडून मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्याचा उपक्रम राबवला आहे.


का आली उपोषणाची वेळ ?

राज्य सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवर 12 टक्के कर लागू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महिलांच्या आरोग्याच्या विरोधातला असल्याच्या कारण्यावरून उपोषणाचा निर्णय घेतला आणि लातूरहून थेट मुंबई गाठली.

जर गावात सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी कर लागू केला तर, एक सॅनिटरी नॅपकिन 42 रुपयाला पडेल. कारण, आता जे सॅनिटरी नॅपकिन्स विकले जातात त्यांची किंमत प्रत्येकी 30 रुपये आहे. जर, 12 टक्के कर लागू झाला तर, त्याची किंमत 42 रुपये एवढी होईल. 

जे जनजागृतीचे काम सरकार आता करत आहे ते काम आम्ही दोन वर्षापूर्वी सुरू केले आहे. त्यामुळे आता जर सरकारने जीएसटी कर लागू केला तर, त्याचा फायदा नेमका कोणाला होणार? असा प्रश्न छाया यांनी उपस्थित केला आहे.


काय आहेत मागण्या ?

  • सॅनिटरी नॅपकिन्स रेशनिंग दुकानावर उपलब्ध करून द्या
  • सॅनिटरी नॅपकिन्स जीएसटीतून वगळा
  • कर्करुग्ण महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स आणि आरोग्याच्या सुविधा मोफत द्या
  • माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात सॅनिटरी वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन बसवा
  • पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन युनिट बचत गटांना चालवण्यास द्या
  •  स्वयंरोजगार मिळवून द्या


मंगळवारी रात्री अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा होणार आहे.  जर, त्या चर्चेत जीएसटी कराविषयी सकारात्मक तोडगा निघाला नाही तर, मुनगंटीवार यांनाही आम्ही 5 सॅनिटरी नॅपकिन्सचे पॉकेट देऊ .

- छाया काकडे, सामाजिक कार्यकर्त्या

पंतप्रधानांनाही याबाबतचे ट्विट केले आहे. पण, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आलेला नाही. महाराष्ट्रात जे उत्पादन केले जाते, त्या कुठल्याच वस्तूंवर कर लागणार नाही, असे हमीपत्र हवे आहे. त्यांना सॅनिटरी नॅपकिन्सही पाठवले आहेत. 

आपल्या महाराष्ट्रात फक्त लातूरच्या एका जिल्हापरिषदेच्या शाळेत सॅनिटरी वेंडिंग मशीन आहे. पण, तामिळनाडूसारख्या राज्यात प्रत्येक शाळेत सॅनिटरी वेंडिंग मशीन लावलेल्या आहेत. मग, आपले सरकार कसली प्रगती करत आहे. 

सरकारने महिलांच्या कुंकू, टिकली यावर कर लावलेला नाही. मग, सॅनिटरी नॅपकिन्सच का? कंडोम हा देखील परदेशात तयार केला जातो. त्यावरही जीएसटी लावलेला नाही. पण, महिलांच्याच उपयुक्त गोष्टीवर कर का? असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला आहे.

आतापर्यंत छाया काकडे यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी भेट घेतली आहे. मंगळवारी संध्याकाळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही त्या भेट घेणार आहेत. पण या भेटीनंतरही जर तोडगा निघाला नाही तर, 1 जुलैला दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.



हे देखील वाचा - 

'पंतप्रधानांना सॅनिटरी नॅपकिन्स पाठवू' 

'गायीपेक्षा बाईचं दुखणं समजून घ्या...'



पुढील बातमी
इतर बातम्या