अर्जुन तेंडुलकरची टी-२० मुंबई लीगमधून माघार

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रिकेट

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) बहुप्रतिक्षीत टी-२० मुंबई लीगमध्ये दिग्गज खेळाडूंचा जलवा पाहण्याची संधी मुंबईकरांना लाभणार अाहे. मात्र मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने टी-२० मुंबई लीगमधून माघार घेतली अाहे. अद्याप व्यावसायिक क्रिकेटसाठी परिपक्त नसल्याचे कारण देणारा ज्युनियर तेंडुलकर अाता अापल्या गोलंदाजी शैलीत सुधारणा करणार अाहे. विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकर या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर अाहे.

एक वर्ष क्रिकेटपासून दूर होता अर्जुन

पुणेस्थित प्रशिक्षक अतुल गायकवाड यांच्या देखरेखीखाली अर्जुन सध्या गोलंदाजीचे धडे गिरवत अाहे. वाढत्या वयानुसार अर्जुनच्या शरीरातही अनेक बदल होत अाहेत. पण अर्जुनला दोन वेळा स्ट्रेस फ्रॅक्चरचा सामना करावा लागला होता, त्यामुळे एक वर्ष तो क्रिकेटपासून दूर होता. ८ जानेवारीपासून त्याने गोलंदाजी करायला सुरुवात केली होती, पण अद्याप तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. सचिन तेंडुलकरशी चर्चा केल्यानंतरच अर्जुनच्या माघारीचा निर्णय घेण्यात अाल्याचे समजते.

शनिवारी होणार खेळाडूंचा लिलाव

शनिवारी वांद्रे येथील एका हाॅटेलमध्ये खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया रंगणार अाहे. ज्युनियर खेळाडूंवरही मोठ्या रकमेची बोली लागण्याची शक्यता अाहे. त्यातच १८ वर्षीय अर्जुन तेंडुलकरने माघार घेतल्यामुळे फ्रँचायझींना मोठा धक्का बसला अाहे. १९ वर्षांखालील कूचबिहार करंडक स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरने चांगली कामगिरी केली होती. दोन वेळा पाच विकेट्स तर एकदा चार विकेट्स मिळवत त्यानं अापण फाॅर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं होतं.

९०० जणांमधून निवडणार खेळाडू

एमसीएने ९०० खेळाडूंची यादी फ्रँचायझींकडे पाठवली असून त्यातून २०० ते २५० खेळाडूंचा लिलावात समावेश केला जाणार अाहे. प्रत्येक संघात एक अायकाॅन खेळाडूसह १६-२० क्रिकेटपटूंची निवड केली जाणार अाहे. खेळाडूंसाठी सॅलरी पर्स ३५ लाख रुपये इतकी ठेवण्यात अाली अाहे. अजिंक्य रहाणे अाणि धवल कुलकर्णी यांचा अायकाॅन खेळाडूंमध्ये समावेश असण्याची अपेक्षा अाहे. मात्र रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर अाणि श्रेयस अय्यर यांच्या सहभागाविषयी एमसीएकडून माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.


हेही वाचा - 

नीरव मोदी-पीएनबी घोटाळ्याचा टी-२० मुंबई लीगला फटका!

मुंबई टी-२० लीगला जाणवणार दिग्गज खेळाडूंची वानवा

पुढील बातमी
इतर बातम्या