Advertisement

नीरव मोदी-पीएनबी घोटाळ्याचा टी-२० मुंबई लीगला फटका!


नीरव मोदी-पीएनबी घोटाळ्याचा टी-२० मुंबई लीगला फटका!
SHARES

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टी-२० मुंबई लीगच्या अायोजनामागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाहीये. एमसीएच्या या बहुप्रतिक्षीत लीगच्या अायोजनात अातापर्यंत अनेक विघ्नं अाली अाहेत. अाता नीरव मोदी-पीएनबी घोटाळ्याचा फटका या लीगला बसला अाहे. या स्पर्धेतील सहा फ्रँचायझींमधील एक असलेल्या श्री नमन ग्रूप अाॅफ डेव्हलपर्स या रिअल इस्टेट कंपनीने बँक गॅरंटी भरण्यास असमर्थ असल्याचे कारण देत माघार घेतली अाहे. नीरव मोदीने पीएनबी बँकेत ११ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्यानंतर बँकांनी बँक गॅरंटीसंदर्भातील नियम अधिक कडक केल्यामुळे नमन ग्रूपने या स्पर्धेतून अापली फ्रँचायझी मागे घेतली अाहे. नमन ग्रूपने या स्पर्धेच्या अायोजनाचे हक्क असलेल्या प्रोबॅबिलिटी स्पोर्टसला पत्र लिहून अापण या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे कळवले अाहे. अापणास बँक गॅरंटी मिळवण्यात अडचणी येत अाहेत, असेही या पत्रात त्यांनी म्हटल्याचे प्रोबॅबिलिटी स्पोर्टसचे सीईअो कादर मकानी यांनी सांगितले.

बँक गॅरंटीचे नियम कठोर

नीरव मोदीने केलेल्या पीएनबी घोटाळ्यानंतर बँकांनी याप्रकरणी बँक गॅरंटीसंदर्भातील नियम अधिक कडक केले अाहेत. यापूर्वी व्यवस्थापकीय स्तरावर बँक गॅरंटी सहजपणे उपलब्ध होत होती. पण अाता बँक गॅरंटी मिळवण्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयाला फोन करावा लागतो. त्यानंतर बँक गॅरंटी मिळवण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागतो. ‘‘या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी अाम्ही श्री नमन ग्रूपला बुधवारपर्यंतची मुदत दिली अाहे. पण याप्रकऱणी तोडगा निघू शकण्याची शक्यता फारच कमी अाहे,’’असे एमसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

काय अाहेत एमसीएचे नियम?

प्रत्येक फ्रँचायझीने बोली लावून विकत घेतलेल्या रकमेपेक्षा पाच पटीने रकमेची बँक गॅरंटी सर्व संघमालकांनी सादर करणे अनिवार्य अाहे. श्री नमन ग्रूपने मुंबई उत्तर या संघाची फ्रँचायझी विकत घेण्यासाठी सर्वाधिक रकमेची म्हणजेच ६.५ कोटींची बोली लावली होती. त्यासाठी श्री नमन ग्रूपने १ कोटी रुपयांची रक्कम एमसीएकडे भरली होती. या क्षणी त्यांनी माघार घेतली तर त्यांना या सर्व रकमेवर पाणी सोडावे लागेल. ११ मार्च ते २१ मार्चदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेला फक्त पंधरवडा शिल्लक राहिल्यामुळे एमसीएने सर्व संघमालकांचे वर्कशाॅप अायोजित केले अाहे. मात्र एका फ्रँचायझीने माघार घेतल्यामुळे एमसीएपुढील अडचणी अधिक वाढत चालल्या अाहेत. अद्याप सहा संघांची नावेही निश्चित करण्यात अालेली नाहीत.


हेही वाचा -

मुंबई टी-२० लीगला जाणवणार दिग्गज खेळाडूंची वानवा

सचिन तेंडुलकरची टी-२० मुंबई लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड

एमसीएच्या मुंबई टी-२० लीगचा पुन्हा फियास्को? दुसऱ्यांदा मागवल्या संघांसाठी निविदा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा