मुंबईकरांना मिळणार चामिंडा वास, वासिम जाफरकडून प्रशिक्षण

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुंबईत सर्वच ठिकाणी सराव शिबिरांना सुरुवात होते. ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर क्रिकेट’ या क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात होतकरू क्रिकेटपटूंना श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज चामिंडा वास आणि भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. 

ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे पुन्हा एकदा १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील आणि १७-२३ वयोगटातील खेळाडूंसाठी १० दिवसीय सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी या शिबिराला तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर, आयोजकांनी चामिंडा वास आणि वासिम जाफरची पुन्हा एकदा या शिबिरासाठी निवड केली आहे.

इथे होईल निवड चाचणी

या सराव शिबिरात सहभागी होण्यासाठी या सोमवारपासून सकाळी ९.३० वाजता ओव्हल मैदान येथील प्लॉट नंबर ८ येथे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतूनच या सराव शिबिरासाठी युवा क्रिकेटपटूंची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी संदीप शिंदे (७९७७२४०९३०) आणि दर्शना (७५०६८६५१६५) यांच्याशी संपर्क साधावा.

काय शिकता येईल?

या सराव शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे चामिंडा वासकडून गोलंदाजांना वेगवान तसेच स्विंग गोलंदाजीचे कौशल्य शिकता येईल. त्याचबरोबर वासिम जाफर फलंदाजांना फलंदाजीचे कौशल्य, क्षेत्ररक्षण, टेम्परामेंट आणि फिटनेसविषयीच्या मुद्द्यांवर प्रशिक्षित करेल. चामिंडा वासने याआधी न्यूझीलंड, श्रीलंका आणि आयर्लंड संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका निभावली आहे.


हेही वाचा -

चामिंडा वास देतोय युवकांना जलदगती गोलंदाजीचे धडे!

मुंबईकर वासिम जाफर विदर्भसाठी मोफत रणजी खेळतो तेव्हा...

पुढील बातमी
इतर बातम्या