भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सचिन तेंडुलकर यानं २७ मार्चला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. कोरोनावरील उपचारांसाठीच सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाची लागण झाल्यापासून मागील काही दिवसांपासून सचिन घरीच क्वारंटाइन होता. मात्र, आता डॉक्टरांच्या सल्लानुसार तो रुग्णालयामध्ये दाखल झाला आहे.
याबाबत सचिन तेंडुलकर यानं ट्विट करत ही माहिती दिली आहे. 'माझ्या तब्बेतेसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा', असं म्हटलं.
शिवाय, २ एप्रिल २०११ रोजी भारतानं वर्ल्ड कप जिंकला. आज २ एप्रिल असून त्याला १० वर्ष पूर्ण झाली. त्यामुळं त्यानं २०११ साली विश्वचषक जिंकल्याच्या आठवणींना उजाळा देणारं एक वाक्यही या ट्विटमध्ये लिहिलं आहे. 'सर्व भारतीय आणि संघ सहकाऱ्यांचं विश्वचषक विजयाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन', असं सचिननं म्हटलं आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळणाऱ्या भारतीय संघाचा भाग असणाऱ्या सचिनपाठोपाठ युसूफ पठाणलाही करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती शनिवारीच समोर आली. युसूफने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली होती. शनिवारी दुपारी सचिन तेंडुलकरने करोना झाल्याचं स्पष्ट केलं तर त्यानंतर रात्री युसूफने त्याला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली होती.
हेही वाचा -