Advertisement

आता एक्स्प्रेसमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग करण्यावर बंदी

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आग लागल्यानंतर रेल्वे प्रशासनानं आता कठोर निर्णय घेतले आहेत.

आता एक्स्प्रेसमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग करण्यावर बंदी
SHARES

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आग लागल्यानंतर रेल्वे प्रशासनानं आता कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता प्रवाशांना रात्रीच्यावेळी प्रवास करताना एक्सप्रेसमध्ये मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग करता येणार नाही. आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. मुंबई मिरर या दैनिकानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रेल्वेनं रात्रीच्यावेळी मोबाईल चार्जिंग पॉइंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबतची ही माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेनं एक्स्प्रेसमधील चार्जिंग पॉइंट रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं.

लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये रात्रभर मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग केले जातात. त्यामुळे होणारी ओव्हर चार्जिंग आणि हिटींगमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं दिलेल्या या आदेशाचं आम्ही पालन करत आहोत. याबाबत रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना जागरूक करण्याचं काम आम्ही करत आहोत, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं.

मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. याबाबत आम्हाला दिवसातून किमान तीन तरी तक्रारी ऐकायला मिळतात, असं तिकीट चेकिंग स्टाफचं म्हणणं आहे. तर रेल्वेनं एसी मॅकेनिकसह सर्व कर्मचाऱ्यांना रात्री चार्जिंग पॉइंट बंद ठेवण्यास सांगण्यात आल्याचं एका रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

तसंच अधिकाऱ्यांना स्वत: सरप्राईज भेट देऊन चार्जिंग पॉइंट बंद आहेत की नाही हे पाहण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं. तर काही अधिकाऱ्यांनी रेल्वेत स्मोकिंगला बंदी घालण्याची गरजही व्यक्त केली आहे. स्मोकिंगमुळे आगीची घटना घडल्यास त्यामुळे सार्वजनिक संपत्तीचं नुकसानच होतं, असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रेल्वेच्या या नव्या आदेशाला रेल्वे संघटनांनी विरोध केला आहे. चार्जिंग पॉइंट बंद करण्याचा निर्णय योग्य नाही. प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याऐवजी त्या कमी केल्या जात आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे, असं मत वेस्टर्न रेल्वे झोनल यूजर्स कन्स्लटेटीव्ह कमिटीचे सदस्य शैलेश गोयल यांनी सांगितलं.



हेही वाचा

लोकलच्या जनरल डब्यांना एसी डबे जोडण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार

एसटीच्या ताफ्यात लवकरच ७०० बस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा