कोरोनाच्या संकटामुळे भारताऐवजी युएईत आयोजित करण्यात येणाऱ्या इंडियन प्रीमियर लिग (IPL) च्या १३ व्या हंगामाचं वेळापत्रक अखेर बीसीसीआयने रविवार ६ सप्टेंबर रोजी जाहीर केलं आहे. या सीझनमध्ये गेल्या वर्षी विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेता राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात ओपनिंग मॅच होणार आहे.
आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईत रंगणार आहे. त्यानुसार मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील सलामीचा सामना १९ सप्टेंबरला होणार आहे. आयपीएलच्या ८ संघांमध्ये ३ नोव्हेंबपर्यंत साखळी सामने होतील. प्ले आॅफ फेरीतले सामने झाल्यानंतर १० नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल.
हेही वाचा - 'चेन्नई'ला मोठा धक्का, 'या' खेळाडूचीही आयपीएलमधून माघार
प्राथमिक फेरीपासून ते अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजेची असेल. आयपीएलमध्ये शनिवारी आणि रविवारी दोन सामने ठेवण्यात येतात. यावर्षीही याप्रमाणे सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे दोन सामने होणार असतील तर आयपीएलमधील पहिला सामना हा दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरु करण्यात येईल. तर दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजेपासून सुरू होईल.
आयपीएलच्या १३ हंगामाच्या वेळापत्राकानुसार स्पर्धेतील एकूण सामन्यांपैकी २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजामध्ये होणार आहेत. बीसीसीआयने साखळी सामन्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. चेन्नई संघातील अन्य खेळाडूंच्या कोरोना चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहण्यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर करण्याचं टाळले होतं. त्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंची सलग दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी सराव सुरू केला. तर बीसीसीआयनेही वेळापत्रक जाहीर केलं.