तिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला धक्का, केएल राहुल मायदेशी परतला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सिडनी कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांमधून दुखापतीमुळे विकेटकीपर-फलंदाज के एल राहुल  बाहेर गेला आहे. शनिवारी सराव सत्रात त्याला दुखापत झाली होती.

भारतीय संघ तिसरा कसोटी सामना जिंकून चार सामन्यांच्या या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असतानाच के एल राहुल याला दुखापत झाली. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे तो उर्वरित मालिकेला मुकणार आहे. 

बीसीसीआयने निवेदनाद्वारे के एल राहुलच्या दुखापतीसंबंधी माहिती दिली आहे. ‘शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव करत असताना के एल राहुलच्या मनगटाला दुखापत झाली. यष्टीरक्षक आणि फलंदाज के एल राहुलला दुखापतीतून पूर्ण बरं होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी तो उपलब्ध नसेल. तो आता भारतात परतणार आहे. अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून दुखापतीमुळे मायदेशी परतणारा हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी मोहम्मद शमी आणि उमेश यादवही दुखापतीमुळे भारतात आले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात के एल राहुल प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नव्हता. तिसऱ्या कसोटीत त्याची निवड होण्याची शक्यता होती. मात्र त्याआधीच त्याला दुखापतीने ग्रासल्याने तो मालिकेतूनच बाहेर पडला आहे.


हेही वाचा -

लोकलमध्ये लवकरच उपलब्ध होणार वायफाय

मुंबई ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टवर बंदी


पुढील बातमी
इतर बातम्या