मुंबईच्या अाणखी एका प्रशिक्षकाचा राजीनामा

मुंबई क्रिकेट संघापुढील विघ्नं कमी होण्याची कोणतीच चिन्हं दिसत नाहीत. मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदावरून समीर दिघे पायउतार झाल्यानंतर सतीश सामंत यांनीही मुंबईच्या ज्युनियर संघाचा राजीनामा दिला होता. जवळपास महिनाभराच्या कालावधीनंतर त्यांच्या जागी अनुक्रमे विनायक सामंत अाणि विल्किन मोटा यांची नियुक्ती केल्यानंतर अाता मुंबई संघाच्या अाणखी एका प्रशिक्षकानं राजीनामा दिला अाहे. मुंबईच्या १६ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक विनायक माने यांनी अापल्याला सेवेतून मुक्त करण्यात यावं, असं राजीनामापत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) पाठवलं अाहे.

विनायक मानेची कारकीर्द

फलंदाज-अाॅफस्पिनर असलेल्या विनायक मानेने मुंबई अाणि जम्मू व काश्मीर संघाचे प्रतिनिधीत्व केलं अाहे. विनायकनं ५७ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळताना २९७१ धावा फटकावल्या असून १ विकेटही मिळवली अाहे. गेल्या सहा वर्षांपासून पारसी जिमखान्याचे प्रशिक्षक अाणि खेळाडू अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या विनायक माने यांनी याअाधी मुंबईच्या २३ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले अाहे.

यापुढे मला मुंबईच्या सिनियर खेळाडूंसोबत काम करायचे असून जेणेकरून मुंबईला भविष्यात चांगले प्रथम श्रेणी क्रिकेटपटू मिळू शकतील. मुंबईच्या १६ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याची संधी दिल्याबद्दल मी एमसीएचा अाभारी अाहे. अाता मला माझ्या सेवेतून मुक्त करण्यात यावे.

- विनायक माने, मुंबईचा माजी क्रिकेटपटू


हेही वाचा -

विनायक सामंत बनला मुंबईचा प्रशिक्षक!

समीर दिघेंचा मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा


पुढील बातमी
इतर बातम्या