राहुल द्रविड बनले भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक

भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)चे सचिव जय शहा यांनी दिली. याआधीपासूनच या दौऱ्यासाठी राहुल द्रविड यांच्या नावाची चर्चा होतीच, परंतु आता बीसीसीआयकडून अधिकृतपणे हे सांगण्यात आलं आहे.

भारतीय संघासोबत काम करण्याची ही द्रविड यांची दुसरी वेळ असेल. याआधी द्रविडने २०१४ साली इंग्लंड दौऱ्यात संघाचा फलंदाजीचा सल्लागार म्हणून काम पाहिलं होतं. द्रविड गेली अनेक वर्षे १९ वर्षांखालील भारतीय संघ आणि इंडिया ‘अ’ संघाला प्रशिक्षण देत आहेत.

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २८ जून रोजी श्रीलंकेला रवाना होईल. त्यानंतर ३ दिवस क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करून ते एकत्र सराव सुरू करतील. या दौऱ्याची सुरुवात १३ जून रोजी वनडे मालिकेने होणार आहे. 

जुलै महिन्यात भारताचा एक संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असेल तेव्हा दुसरा संघ श्रीलंकेत मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसतील. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड हे इंग्लड दौऱ्यावर असतील. त्यामुळेच राहुल द्रविड यांची श्रीलंका दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

या दौऱ्यासाठी भारतीय खेळडू सोमवारी मुंबईत दाखल झाले आहेत. ७ दिवस कडक क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर ते ७ दिवस एकत्र सराव करतील. श्रीलंका दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात वनडे आणि टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असेल. 

(rahul dravid became a head coach of indian cricket team for sri lanka tour)


हेही वाचा-

संभाजीराजेंना आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं- अजित पवार

सर्वसामान्यांसाठी लोकल कधी धावणार? विजय वडेट्टीवार यांनी दिलं स्पष्टीकरण


पुढील बातमी
इतर बातम्या