Advertisement

संभाजीराजेंना आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं- अजित पवार

आंदोलन करण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

संभाजीराजेंना आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं- अजित पवार
SHARES

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कोल्हापूर इथून मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. या आंदोलनाविषयी विचारलं असता, आंदोलन करण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. 

अधिवेशनावर विचार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये सोमवारी पुण्यात बैठक झाली. 'दोन्ही छत्रपती घराण्यांना मोठा सामाजिक वारसा असून, आम्ही समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे. दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही,' असे नमूद करत संभाजीराजे यांनी १६ जूनपासून पुकारलेल्या मूक आंदोलनाच्या मागण्या मांडल्या. 'मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत आमच्यासह समाजाने भूमिका मांडली आहे, आता लोकप्रतिनिधींनी बोलावे, असं संभाजी राजे म्हणाले होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. त्यावर ५ जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या अधिवेशनात चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

हेही वाचा- आता आरटीओत न जाताच मिळेल लर्निंग लायसन्स

आंदोलनाचा सर्वांना अधिकार

तसंच आंदोलनावर बोलताना, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. संभाजीराजे यांनी कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, अशा रितीने सर्वांची काळजी घेऊन आंदोलन करावं. मात्र त्याआधी आंदोलन करण्याऐवजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करावी, असं आवाहन मी केलं होतं. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसंच हसन मुश्रीफ हेही सहभागी होतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापुराला वैचारिक, पुरोगामी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून करत आहोत, असं सांगितलं. आंदोलनादरम्यान कोणीही कोणत्याही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा. हे मूक आंदोलन शिस्तीत पार पाडायला हवं. तसंच शांततेत आणि कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन आंदोलन करण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. 

'असं' होईल आंदोलन

कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. १६ जूनला दहा ते एक या वेळेत उपोषण होणार असून कोल्हापूरात आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर पुढे प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे ५ जिल्ह्यात मूक आंदोलन होईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार व तेथील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येईल.

(ajit pawar comment on maratha reservation rally in kolhapur)

हेही वाचा- सर्वसामान्यांसाठी लोकल कधी धावणार? विजय वडेट्टीवार यांनी दिलं स्पष्टीकरण

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा