Advertisement

आता आरटीओत न जाताच मिळेल लर्निंग लायसन्स

शिकाऊ वाहनचालक ई-परवाना तसंच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

आता आरटीओत न जाताच मिळेल लर्निंग लायसन्स
SHARES

आता शिकाऊ वाहनचालक परवाना घेण्यासाठी परिवहन कार्यालयात जाण्याची गरज नाही. शिकाऊ वाहनचालक ई-परवाना तसंच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

“सारथी ४.०” या अद्ययावत प्रणालीअंतर्गत आधार क्रमांकांशी संलग्न असलेल्या ऑनलाईन शिकाऊ वाहन चालक परवाना तसंच वाहन नोंदणीच्या ऑनलाईन प्रणालीचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते करण्यात आलं.

खर्चात बचत

राज्यात दरवर्षी सुमारे १५ लाखापेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात तसंच २० लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. या कामी नागरिकांचा अंदाजे  १०० कोटी रुपयांचा खर्च होतो. आता या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत  होऊन नागरिकांचा वेळ व श्रमही वाचणार आहे. हे काम करणाऱ्या अंदाजे २०० अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत झाल्याने विभागाच्या कामाची दर्जोन्नती करणंही यातून शक्य होईल.

नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तम सेवा महाराष्ट्रात (maharashtra) उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा. सुरक्षित प्रवासाबरोबर सर्वसामान्य जनतेला अधिकाधिक सेवा ऑनलाईन स्वरूपात देऊन त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम कसे वाचवता येतील यासाठीही प्रयत्न करावेत. वेगवान आणि पारदर्शी सेवा उपलब्ध करून देताना विभागाने सुरक्षित परिवहन सेवेला प्राधान्य द्यावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

हेही वाचा- सर्वसामान्यांसाठी लोकल कधी धावणार? विजय वडेट्टीवार यांनी दिलं स्पष्टीकरण

परिवहन सेवेतील क्रांतीकारी पाऊल

जनहिताच्या दोन ऑनलाईन सेवांचं लोकार्पण हे या क्षेत्रातील क्रांतीकारी पाऊल असल्याचं सांगतांना परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यावेळी म्हणाले की, आजच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गर्दी टाळून विभागाचे नियमित कामकाज सुरु ठेवण्यासाठीही त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विभागामार्फत आतापर्यंत जनहिताच्या ८५ सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली.

डिजिटल सेवा

शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही. नवीन वाहन नोंदणीकरिता यापूर्वी वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत करण्यात येत होती. आता अशा पद्धतीने वाहन तपासण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली असून यापुढे नवीन वाहनांची वितरकाच्या स्तरावर तत्काळ नोंदणी होईल. 

वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्रे डीएससी (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) चा उपयोग करुन ई स्वाक्षरी पद्धतीने तयार करण्यात येतील. त्यामुळे कार्यालयात वाहन अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्याक्षणी वाहन क्रमांक जारी होणार आहे, अशी माहिती विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी दिली. 

हेही वाचा- घरोघरी जावून कोरोना लस देण्यासाठी केंद्र सरकारचा नकार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा