गॅरी कर्स्टन घेणार मुंबईतील प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

दक्षिण अाफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अाणि भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन अाता भारतातील प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध घेणार अाहेत. देशभर घेण्यात येणाऱ्या टॅलेंट सर्चद्वारे युवा क्रिकेटपटू शोधण्याचे काम गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमीतर्फे केले जाणार अाहे. याचा श्रीगणेशा मुंबईपासून होणार असून २३ अाणि २४ एप्रिल रोजी पोलीस जिमखाना ग्राऊंडवर दोनदिवसाचे शिबिर अायोजित करण्यात अाले अाहे.

पोलीस जिमखान्यावर रंगणार शिबिर

मुंबई पोलीस जिमखान्यावर दोनदिवसीय शिबिर रंगणार असून गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियामार्फत १४ वर्षांखालील, १९ वर्षांखालील अाणि खुल्या गटातील क्रिकेटपटूंचा शोध घेतला जाणार अाहे. या अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक रायन व्हॅन नायकेर्क अाणि त्यांचे सहकारी पुरुष अाणि महिला क्रिकेटपटूंचा शोध घेतील.

या शहरातही होणार शिबिर

बंगळुरू (२८-२९ एप्रिल), पुणे (२-३ मे), दिल्ली (१०-११ मे), चेन्नई (१४-१५ मे), जयपूर (१७-१८ मे) या शहरांमधूनही प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध घेतला जाणार अाहे. प्रत्येक शहरातून निवडलेल्या प्रत्येकी सहा क्रिकेटपटूंना पुणे येथे जुलै महिन्यात होणाऱ्या शिबिरासाठी निमंत्रित केले जाणार अाहे. या ३६ खेळाडूंपैकी ३ जणांना २ लाख रुपयांची स्काॅलरशिप प्रदान केली जाणार अाहे.

भारतामध्ये अफाट गुणवत्ता अाहे. छोट्याशा गावांमधून ते मोठ्या शहरांमध्ये युवा क्रिकेटपटूंमध्ये ठासून गुणवत्ता भरली अाहे. त्यांच्याच शोध अाम्हाला घ्यावयाचा अाहे. या होतकरू खेळाडूंना घडवण्यासाठी गॅरी कर्स्टन क्रिकेट कटिबद्ध अाहे.

- गॅरी कर्स्टन, दक्षिण अाफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू

भाग घेण्यासाठी हे करावे लागेल

या शिबिरात भाग घेण्यासाठी ९११२२९५५६६ या व्हाॅटसअॅप क्रमांकावर अापल्या शहराचे नाव अाणि संपूर्ण माहिती पाठवायची अाहे. ही माहिती मिळाल्यानंतर त्या खेळाडूला प्रवेश अर्जाची अंतिम लिंग पाठवण्यात येईल. त्यानंतर कोणत्या दिवशी, कुठे भाग घ्यावयाचा, याबाबतची माहिती कळवण्यात येईल. या शिबिरात भाग घेण्यासाठी १ हजार रुपयांचे शुल्कही अाकारण्यात येईल.


हेही वाचा -

धोनीच 'बेस्ट' - कर्स्टन

पुढील बातमी
इतर बातम्या