घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदा बेटिंग करणाऱ्या ११ जणांना अटक

मुंबईच्या महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदा बेटिंग लावणाऱ्या ११ जणांना गुन्हे शाखा २ च्या पोलिसांनी अटक केली आहे. चेतन सोलंकी, इलियास गालीयार, हमजास दाजी, प्रशांत जोगडिया, परेश शाह, संदीप यादव, संदीप शिर्के, अफजली नवाबअली, ब्रायन मॅकवन, राजेश अग्रवाल, मोहम्मद सरवार अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या सर्वांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

जीएसटी टाळण्यासाठी

महालक्ष्मी रेसकोर्स तसंच इतर ठिकाणी घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग करण्यासाठी अधिकृत परवानगी तसंच तिकीट खरेदी करावी लागते. तसं केल्यास यावर जीएसटी भरावा लागतो. हा जीएसटी भरावा लागू नये यासाठी पैसे घेऊन बेकायदापणे बेटिंग केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनच्या पथकाने महालक्ष्मी रेसकोर्स येथे सापळा रचून या ११ जणांना अटक केली. या पूर्वीही महालक्ष्मी रेसकोर्सवर अनधिकृतरित्या बेटिंग खेळल्याचं उघडकीस आलं आहे.

डिसेंबर २०१८ मध्ये कारवाई

डिसेंबर २०१८ मध्ये रेसकोर्सवर सुरू असलेल्या शर्यतींवर काही स्टॉल मालक हे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडमधील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने बेटिंगमध्ये स्वीकारलेल्या रकमेच्या खोट्या नोंदी करून कर बुडवत होती. याची माहिती पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांना मिळाली. अभिनाश कुमार यांनी नागपाडा, भायखळा, वरळी आणि आग्रीपाडा या पोलिस ठाण्यातील वीस पोलिस अधिकारी आणि ५० पोलिस कर्मचाऱ्यांचं विशेष पथक तयार करत कारवाई केली. खोट्या नोंदी करून बेटिंग घेणाऱ्या १८ जणांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी त्यावेळी त्यांच्याकडून १ कोटी ४० लाख ८८ हजारांची रोकड, २९ लॅपटॉप, मोबाइल फोन असा सुमारे दीड कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्याचप्रमाणे बेटिंगच्या खोट्या नोंदी केलेली काही कागदपत्रेही या स्टॉलधारकांकडे सापडली.


हेही वाचा -

'हे' आहेत मुंबईतले टाॅप एन्काऊंटर स्पेशलिस्ट

खोटे सोनं तारण ठेवून बँकेची फसवणूक, कर्मचाऱ्याला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या