अंधेरीत भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग

मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. गुरुवारी असाच एक प्रकार अंधेरीच्या जे. बी. नगर परिसरात समोर आला आहे. इथे १७ वर्षीय मुलीचा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भर रस्त्यात विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

अंधेरी परिसरात राहणारी १७ वर्षीय मुलगी गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास क्लासवरून घरी जात होती. ती जे. बी. नगर परिसरातून जात असताना अचानक एक इसम तिच्या मागून आला. मुलीला काही समजण्याच्या आत त्याने तिला मिठी मारली. अचानक घडलेल्या प्रकाराने घाबरून गेलेल्या तरुणीने आरडा ओरड केली.

स्थानिक धावले मदतीला

मुलीचा आवाज ऐकून स्थानिक रहिवासी मुलीच्या मदतीला धावले; पण तोपर्यंत हा तरुण अंधारात गायब झाला. मुलगी अतिशय घाबरलेली असल्याने ती तशीच घरी गेली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने पोलीस अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात भादंवि ३५४ (विनयभंग) आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे शोध

ज्या तरुणाने मुलीचा विनयभंग केला तो २० ते २५ वर्षांचा असल्याचं मुलीने आपल्या जबाबात सांगितलं आहे. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने त्याचा शोध घेत असल्याची माहिती झोन १० चे डीसीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.


हेही वाचा-

दाऊदच्या प्रॉपर्टीवर शौचालय बांधणार- चक्रपाणी स्वामी

बोगस डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनने तरुणाचा मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या