बोगस डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनने तरुणाचा मृत्यू


बोगस डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनने तरुणाचा मृत्यू
SHARES

बनावट डॉक्टरने केलेल्या उपचारांमुळे एका तरुणाचा जीव गेल्याचा दुर्देवी प्रकार गोवंडीत समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत देवनार पोलिसांनी अटक केली आहे.


काय आहे प्रकरण?

गोवंडीत राहणारा तरूण प्रदीप जाधव (२५) याला रविवारी ताप आला होता. तापावर उपचार घेण्यासाठी प्रदीप जवळील डॉक्टर शहाबाज आलम मोहम्मद हारून सिद्दीकी (३६) यांच्या दवाखान्यात गेला. तिथे शहाबाजने प्रदीपला तपासल्याचं नाटक केलं आणि त्याला इंजेक्शन आणि गोळ्या देऊन घरी पाठवलं. इंजेक्शन आणि गोळ्या घेतल्यावर प्रदीपची स्थिती आणखीनच खालावली. त्याच्या पायाला सूज येऊ लागली म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा तो डॉक्टरकडे गेल्यावर पुन्हा शहाबाजने त्याला इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या. मात्र त्याला बरं वाटलं नाही.   

तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी प्रदीप शहाबाजकडे गेल्यावर यावेळी त्याचा दवाखाना बंद होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला सुरूवातीला दुसऱ्या खाजगी डॉक्टरकडे नेलं. या डाॅक्टरने प्रदीपला शताब्दी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.


उपचारास रुग्णालयांचा नकार

शताब्दी रुग्णालयात डॉक्टरांनी प्रदीपची तपासणी केल्यावर त्याची परिस्थीती गंभीर असल्याचं त्यांना समजलं, म्हणून त्यांनी त्याला राजावाडी रुग्णालयात पाठवलं. तिथे देखील तेच झालं. परिस्थिती आटोक्याबाहेरची आहे, असं सांगत त्याला सायन रुग्णालयात पाठवलं. मात्र, तिथे देखील डॉक्टरांनी त्याला दाखल करण्याऐवजी केईम रुग्णालयात पाठवलं. यांत बराच वेळ निघून गेला. शुक्रवारी संध्याकाळी केईम रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्रदीपचा मृत्यू झाला.


डॉक्टर निघाला बोगस

तपासादरम्यान, डॉक्टर शहाबाज सिद्दीकीकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचं आढळून आलं. त्याचबरोबर प्रदीप जाधवचा मृत्यू इंजेक्शनच्या इन्फेक्शनमुळे झाल्याचं प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर शहाबाज सिद्दीकीला भादंवि ३०४ ( सदोष मनुष्यवध ) ४२० (फसवणूक) त्याच बरोबर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३६ अंतर्गत अटक करण्यात आल्याची माहिती देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. शुक्रवारी शहाबाजला कुर्ला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला १५ तारखेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

शहाबाज सिद्दीकी फक्त १२ वी पास असून गेल्या ४ वर्षांपासून त्याने डिस्पेंसरीत आपल्या भावाची डिग्री लावल्याचं समोर आलं आहे. शहाबाजच्या भावाने उत्तर प्रदेशातील आझमगढ येथून बी. यु. एम. एस. ची डिग्री घेतली असून त्याच्याकडे शहाबाजने इंजेक्शन देण्याचं शिकून घेतल्याचं कळत आहे.


पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

देवनार, मानखुर्द, गोवंडी आणि शिवाजी नगर परिसरात बोगस डॉक्टरांची संख्या जास्त असून या परिसरात पोलिसांच्या मदतीने पालिका प्रशासन बऱ्याचदा बोगस डॉक्टरांवर कारवाई करते, असं असून देखील शहाबाज पालिकेच्या कारवाईतून कसा सुटला? यावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा